Sangli: रमतगमत कर्मचारी आले.. सीईओंनी गेटच बंद केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:30 IST2025-09-03T19:30:24+5:302025-09-03T19:30:46+5:30
कार्यालयात वेळेत न आल्यास कारवाई

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : जिल्हा परिषदेत कार्यालयाची वेळ झाल्यानंतरही रमतगमत येणाऱ्या निवांत कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी चांगलाच झटका दिला. जिल्हा परिषदेची दोन्ही मुख्य प्रवेशदारे १० वाजताच बंद केली. त्यामुळे अनेक लेट लतिफ कर्मचारी बाहेरच अडकून पडले. वेळेत कामावर येण्याची हमी घेऊन त्यांना आत प्रवेश देण्यात आला.
नरवाडे यांनी सोमवारी कार्यभारी घेतला. त्यानंतर दिवसभर विविध विभागांचा मॅरेथॉन बैठका घेत शिस्त आणि कार्यक्षमतेच्या सूचना दिल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर लक्ष केंद्रित केले. ते स्वतः सकाळी पावणेदहा वाजण्यापूर्वीच जिल्हा परिषदेत हजर राहिले. १० वाजता दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूपे लावण्याची सूचना दिली. त्यामुळे १० वाजण्यापूर्वी आलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाता आले, पण त्यानंतर आलेले कर्मचारी मात्र बाहेरच अडकून पडले. एका पाठोपाठ एक निवांतपणे येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गेटबाहेरच गर्दी झाली. अनेकांनी अनेक कारणे सांगितली. एसटी लेट होती, गाडी पंक्चर झाली होती, आजारी होतो अशा कारणांची जंत्री दिली.
उद्यापासून वेळेत येतो, सध्या आत सोडा, अशी विनवणी केली. पण, नरवाडे यांनी त्यांची झाडाझडती घेतली. खातेप्रमुख किंवा कर्मचारी यापैकी कोणीही असला, तरी त्यांनी कार्यालयात वेळेत हजर राहिलेच पाहिले, असे खडसावले. पहिलाच दिवस असल्याने कारवाई करत नाही, उद्यापासून सुधारणा करा, अन्यथा कारवाई करावी लागेल असा सज्जड दम दिला. त्यानंतर प्रवेशद्वार उघडण्यात आले. नरवाडे यांच्या धडाकेबाज कारवाईने कर्मचाऱ्यांत चांगलीच चर्चा सुरू होती.
२५ जण कारवाईत सापडले
जिल्हा परिषद मुख्यालयात कायम आणि कंत्राटी, असे एकूण ३९७ कर्मचारी आहेत. त्यापैकी २५ जण मंगळवारी नरवाडे यांच्या कारवाईत सापडले. कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ आहे. मात्र, अनेकजण निवांत येतात. दुपारी बारा वाजले, तरी अनेक कार्यालयातील टेबलांवर कर्मचाऱ्यांचा पत्ता नसतो. यापूर्वीही काहीवेळा अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी दणका दिला होता. त्यानंतरही त्यांची सवय गेलेली नाही. त्यांच्यावर वचक बसविण्याचे काम नरवाडे यांना करावे लागणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर बुधवारपासून कारवाईचा इशारा त्यांनी दिला.