Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:00 IST2025-12-03T14:00:20+5:302025-12-03T14:00:55+5:30
आष्टा, शिराळा, विटा आणि आटपाडीत मतदान यंत्रात बिघाड, नगराध्यक्ष ४१, नगरसेवकपदाच्या ५९२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद

Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान
सांगली: सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २९१ मतदान केंद्रांवर ७५.९६ टक्के मतदान झाले. शिराळा, विटा आणि आष्टा येथील मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे काहीकाळ मतदान थांबवावे लागले. काही मतदान केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत जोरदार वादावादीच्या घटना घडल्या. या घटना वगळता शहरातील मतदान शांततेत पार पडले. आठ नगराध्यक्षासाठी ४१ उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या १८० जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ५९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील करण्यात आले.
उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा आणि जत या नगरपरिषदांमध्ये आणि शिराळा, आटपाडी या नगरपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रतिष्ठेची लढत लढवली होती. तासगाव, आष्टा आणि आटपाडी येथे स्थानिक आघाड्यांनीही पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले होते.
सकाळच्या टप्प्यात मतदान हळूहळू सुरू होते, परंतु दुपारी मतदानाच्या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली, तरीही सर्व २९१ मतदान केंद्रांवर मतदारांची रांगा होत्या. विटा, पलूस, शिराळा, जत, आटपाडी आणि तासगाव येथील मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा चालू होत्या. सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी दोन लाख ५७ हजार ९७७ मतदार होते. यापैकी एक लाख ९५ हजार ९५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आठ पालिकांमध्ये सरासरी ७५.९६ टक्के मतदान झाले आहे. शिराळा नगरपंचायतीत सर्वाधिक ८३.०८ टक्के तर सर्वात कमी ७०.४६ टक्के मतदान तासगाव नगरपरिषदेत झाले.
आष्टा, शिराळा, विटा आणि आटपाडीत मतदान यंत्रात बिघाड
आष्ट्याच्या प्रभाग तीनमधील अंगणवाडी मतदान केंद्रावर सकाळी ७:३० ते ८:४० पर्यंत आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये सकाळी ७:३० ते ८:४५ पर्यंत ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे मतदारांना थांबावे लागले. आटपाडी नगरपंचायतीच्या मतदानावेळीही मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान थांबावं लागलं. शिराळ्यात प्रभाग ११ मधील केंद्रावर सकाळी मतदान यंत्र खराब झाले; मात्र कर्मचारी ताबडतोब दुसरी ईव्हीएम मशीन आणून मतदान सुरू केले. विटा येथील दोन केंद्रांवर मतदान यंत्र खराब झाल्याच्या तक्रारी आल्या, परंतु नंतर मतदान सुरळीत झाले.
२१ डिसेंबरला मतमोजणी
सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी मतदान झाले आहे. मात्र, मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चक्क उमेदवाराचे मतदान दुसऱ्याने केले
पलूसमध्ये चक्क शिवसेनेचे उमेदवार सुनिल कुंभार यांच्या पत्नी राजश्री कुभार यांचे मतदान दुसऱ्याच महिलेने केल्याने मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. उमेदवाराच्या पती मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
नगरपालिकेसाठी झालेले मतदान
पालिका / टक्केवारी
- उरुण-ईश्वरपूर / ७४.१४
- विटा/ ७९.३६
- आष्टा / ७४.७६
- तासगाव / ७०.४६
- जत / ७२.८५
- पलूस / ८०.२८
- शिराळा/ ८३.०८
- आटपाडी / ७९.६२