Sangli: खून झालेल्या तरुणाचा मृतदेह स्मशानातून संशयितांच्या दारात, विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:19 IST2025-09-10T15:18:44+5:302025-09-10T15:19:04+5:30
अंकली येथे तणाव, कडकडीत बंद : संशयितांची धिंड काढण्याची मागणी

Sangli: खून झालेल्या तरुणाचा मृतदेह स्मशानातून संशयितांच्या दारात, विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून घडली घटना
सांगली : अंकली (ता. मिरज) तरुणाच्या खूनप्रकरणी संशयितांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी अंत्यसंस्कार थांबवून ठेवले. मृतदेह संशयितांच्या घरासमोर नेऊन ठेवला. यामुळे गावात मंगळवारी सकाळपासून तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. दुपारनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंकलीमध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत बाचाबाची होऊन शीतल धनपाल पाटील (वय २५) तरुणाला भोसकण्यात आले होते. त्याचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी गावात आणण्यात आला. त्यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयितांवर तातडीने कारवाईचा आग्रह कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी धरला.
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेलेला मृतदेह पुन्हा गावात आणला. संशयितांच्या घरासमोर ठेवला. संशयितांची गावातून धिंड काढण्याची मागणी लावून धरली. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे गावात दुपारपर्यंत तणावाचे वातावरण होते. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी याची माहिती वरिष्ठांना दिली.
खुनाच्या निषेधार्थ व संशयितांवर कडक कारवाईसाठी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवले. ग्रामस्थांनी सांगितले की, गावाच्या बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. संतप्त ग्रामस्थांची भूमिका पाहून सांगली ग्रामीण पोलिसांनी गावात बंदोबस्तात वाढ केली. निरीक्षक किरण चौगुले यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.
शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जैन मंदिराजवळ गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यावेळी संशयित विकास बंडू घळगे (वय ३५, रा. अंकली) हा मिरवणुकीत नाचू लागला. तेव्हा मंडळाचे कार्यकर्ते सुनील पाटील यांनी त्याला अडवले. ‘तू आमच्या मंडळाच्या मिरवणुकीत नाचू नकोस,’ असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या घळगे याने सुनील पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. पाटील यांचा पुतण्या शीतल भांडण सोडविण्यास गेला.
त्यावेळी घळगे याचे मित्र क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (वय २८), आदित्य शंकर घळगे (वय २२, सर्व रा. अंकली) हे तेथे आले. त्यांनीही सुनील पाटील यांना मारहाण सुरू केली, तर शीतलला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. नातेवाईक व ग्रामस्थांनी शीतलला सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. शीतलचा सोमवारी रात्री मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी मृतदेह गावात आणताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. सारे गावकरी गोळा झाले. मृतदेह स्मशनभूमीत नेण्यात आला, मात्र तेथे गोंधळाला सुरुवात झाली. संशयितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी सुरू केली. त्यामुळे मृतदेह पुन्हा गावात आणण्यात आला. संशयितांच्या घरासमोर ठेवला.
दहशत मोडून काढण्याची मागणी
गावातील तणावाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह गावात आले. त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी कारवाईसाठी आग्रह धरला. गावातील दहशत मोडून काढा, संशयितांची धिंड काढा, कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. चौगुले यांनी कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. मृत शीतल पाटील याला न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. त्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाच्या निषेधार्थ बंद पाळल्याने गावात दिवसभर सर्व व्यवहार बंद राहिले.
गावात विविध समाजातील लोक एकोप्याने राहत आहेत. पण, काही मोजक्या समाजकंटकांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निषेधार्ह आहे. संशयितांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. - शशिकांत पाटील, माजी सरपंच, अंकली
संशयितांना तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी, यादृष्टीने तपास केला जाईल. गावात सध्या शांततेचे वातावरण आहे. - किरण चौगले, पोलिस निरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे