10th, 12th Exam: 'तो' निर्णय परीक्षा मंडळाने घेतला मागे; त्याऐवजी घेतला नवा निर्णय.. जाणून घ्या
By संतोष भिसे | Updated: January 30, 2025 16:41 IST2025-01-30T16:40:09+5:302025-01-30T16:41:02+5:30
कॉपीविरोधात मंडळ आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार

संग्रहित छाया
सांगली : दहावी, बारावी परीक्षांसाठी एका शाळेचे शिक्षक व कर्मचारी अन्यत्र नेमण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने मागे घेतला आहे. त्याऐवजी नवा निर्णय घेताना गैरप्रकार आढळणाऱ्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रात शिक्षकांच्या मदतीने सामूहिक काॅपी होत असल्याचे अनेक प्रकार परीक्षा मंडळाच्या निदर्शनास आले आहेत. याला आळा घालण्यासाठी यंदा शिक्षक व कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेवर नियुक्त करण्यात येणार होते. मात्र याला शिक्षक संघटना, संस्थाचालक व लोकप्रतिनिधींकडून बराच विरोध झाला. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. बुधवारी रात्री मंडळाने जारी केलेल्या एका प्रकटनाद्वारे हा निर्णय मागे घेत असल्याची माहिती सचिव देवीदास कुलाळ यांनी कळविली आहे.
यादरम्यान, कॉपीमुक्तीसाठी मंडळ ठाम असून गैरप्रकार आढळल्यास आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१८, २०१९, २०२०, २०२३ व २०२४ यावर्षीच्या परीक्षांत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रांवर अन्य शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेत कोरोना काळातील म्हणजे २०२१ व २०२२ या वर्षीच्या परीक्षा वगळल्या आहेत. परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत. परीक्षा कालावधीत प्रत्येक केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही केली जाणार आहे.
..तर केंद्र कायमचे रद्द
फेब्रुवारी, मार्च २०२५ मधील परीक्षेत गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित केंद्राची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्यात येणार असल्याचे परीक्षा मंडळाने कळविले आहे.