Sangli: आधी मुलगा, आता पत्नी गेली; खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने आंब्रे कुटुंबच उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:03 IST2025-09-17T18:02:34+5:302025-09-17T18:03:03+5:30
आंब्रे कुटुंबीयांवर वर्षभरात दोन आघात : कुटुंबच उद्ध्वस्त,

संग्रहित छाया
सांगली : पत्र्याचे दोन खोल्याचे घर, पदरात दोन मुलं, काबाडकष्ट करून दोघांनाही वाढवलेलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने अधू होऊन घरातील तरुण मुलाने आत्महत्या केली तर सोमवारी आणखी एका खड्ड्याने त्याच मुलाच्या आईचा अपघातीमृत्यू झाला. दोन खड्ड्यांनी या कुटुंबातील दोन सदस्यांना हिरावून घेत आयुष्यात न भरुन येणारा खड्डा निर्माण केला.
कोकणातील आंब्रे कुटुंबीय ४० वर्षांपूर्वी सांगलीत आले. मोलमजुरी करून संसाराचा गाडा सुरू होता. पण, गेल्या वर्षभरात या कुटुंबावर दोन मोठे आघात झाले. वर्षभरापूर्वी मुलगा गेला आणि काल एसटीने चिरडून पत्नी. भिंतीवर अजूनही मुलाचा फोटा लावलेला आहे. आता त्याच्या शेजारी पत्नीचा फोटो लावण्याची वेळ आली. अपघाताने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले.
प्रकाश आंब्रे, त्यांची पत्नी शीतल, मुलगा यश आणि मुलगी, असा हा परिवार. ३० ते ४० वर्षांपूर्वी कोकणातील देवरुखमधून हे कुटुंब कामाच्या शोधात सांगलीत आले. आकाशवाणीच्या मागे गंगाधरनगरमध्ये छोट्या जागेत पत्र्याच्या शेडवजा घरात प्रकाश यांचा संसार फुलला होता. प्रकाश सकाळी चारचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंगचे काम करुन गॅरेजमध्ये कामाला जात होते. तर पत्नी शीतल या एका साडीच्या दुकानात कामाला होत्या. घराला मदत व्हावी, म्हणून शिवणकाम करीत. तर कधी धुणीभांडी तर कुणाचा स्वयंपाकही करायला त्या जात. घरची परिस्थिती अगदीच बेताची. पत्र्याच्या दोन खोल्यातही सुखी संसाराची स्वप्ने प्रकाश यांनी रंगविली असतील. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
वर्षभरापूर्वी मुलगा यशचा हरिपूर रस्त्यावर अपघात झाला. खड्ड्यामुळे त्याची दुचाकी घसरली अन् त्यात त्याच्या पायाला मोठी जखम झाली. दोन महिने तो अंथरुणावर खिळून होता. प्रकाश व शीतल यांनी त्याच्या उपचारासाठी दिवसरात्र एक केला. प्रसंगी नातेवाइकांनी मदतीचा हात दिला. यशच्या पायावर शस्त्रक्रिया झाली, पण ते दुखणे त्याला सहन झाले नाही. त्यातच त्याने आत्महत्या केली. तरुण पोराच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्या दु:खातून बाहेर पडण्याआधीच पुन्हा या कुटुंबावर काळाने घाला घातला.
कुटुंबाच्या व्यथेने साऱ्यांनाच धक्का
शीतल या कोल्हापूरहून बसने सांगलीत आल्या. आकाशवाणीजवळ त्या बसमधून उतरल्या आणि त्याच बसखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब कोलमडले आहे. घरात अश्रूंच्या धारा वाहत आहेत. नातेवाइक, शेजाऱ्यांच्या ह्दयातही या घटनेने कालवाकालव झाल्याचे दिसत होते.
..तर बळी गेला नसता
आईचे छत्र हरविलेली मुलगी, दु:खाचा डोंगर कोसळलेला बाप आणि कोलमडून पडलेली ७५ वर्षांची आजी, इतके काय ते विश्व उरले आहे. हा रस्ता वेळेत झाला असता, तर आज एक जीव वाचला असता. हा फक्त आंब्रे कुटुंबाचा नाही, तर सगळ्या सांगलीकरांचा प्रश्न आहे.