गुरुजींचे शाळेच्या पहिल्या दिवशीच आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By अशोक डोंबाळे | Published: June 15, 2024 07:00 PM2024-06-15T19:00:29+5:302024-06-15T19:01:33+5:30

शाळाबाह्य कामे रद्दसह शिक्षकांना गणवेशाची सक्ती न करण्याची मागणी

teachers protest on the first day of school  demonstration in front of the collectorate | गुरुजींचे शाळेच्या पहिल्या दिवशीच आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

गुरुजींचे शाळेच्या पहिल्या दिवशीच आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अशोक डोंबाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शाळाबाह्य कामातून मुक्त करण्यासह शिक्षकांना गणवेशाची सक्ती करू नये, यासह विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी शनिवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी जोरदार निदर्शनेही केली.

प्राथमिक शिक्षक समितीकडून शासनाला मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने संच मान्यता व शिक्षक निश्चितीबाबत दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेवरती नियुक्ती करण्याचा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. हे धोरण पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढ करण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरणार आहे. तो शासन निर्णय मागे घ्यावा. नवभारत साक्षरता अभियान हे शिक्षकांचे दैनंदिन अध्यापनावरती परिणाम करणारे आहे. त्यामुळे हे काम बाह्य यंत्रणेमार्फत राबवण्यात यावे. शाळेमध्ये कोणत्याही सोयी सुविधा न देता शिक्षकांच्या खासगी मालकीच्या मोबाइलचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी करण्याची प्रशासनाची मानसिकता वाढत चालली आहे. अशैक्षणिक कामाचा तगादा आणि वेळी अवेळी देण्यात येणाऱ्या सूचना दैनंदिन कामकाजामध्ये अडसर ठरत आहे. शिक्षकांच्या गणवेशांचा निर्णय सुद्धा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. शिक्षकांच्या प्रती अविश्वासाचे व समाजामध्ये शिक्षकां प्रती नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणार आहे. शासनाचे समूह शाळा, दत्तक शाळा योजना व खासगीकरणाचे धोरण या सर्वाला शिक्षक समिती म्हणून आमचा विरोध आहे.

आंदोलनामध्ये शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, किरण गायकवाड, बाबासाहेब लाड, विष्णुपंत रोकडे, शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, सरचिटणीस हरिभाऊ गावडे, सदाशिव पाटील, शशिकांत बजबळे, शिवाजीराव पवार, सुनील गुरव, राजाराम सावंत, विकास चौगुले, महादेव जंगम, राहुल कोळी, प्रताप सावंत, संजय कबीर, दीपक कोळी, तानाजी देशमुख, विनोद पाटील, लक्ष्मण सलगर, प्रदीप मजलेकर आदीसह शिक्षक सहभागी होते.

Web Title: teachers protest on the first day of school  demonstration in front of the collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.