ड्रग्जविरोधात टास्क फोर्स, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 13:18 IST2025-02-03T13:17:48+5:302025-02-03T13:18:18+5:30
‘लोकमत’च्या मालिकेची गंभीर दखल; बंद कारखान्यांच्या झाडाझडतीचे आदेश

ड्रग्जविरोधात टास्क फोर्स, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय
सांगली : अमली पदार्थांचे गोदाम होण्याकडे सांगलीच्या वाटचालीला ब्रेक लावण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावले उचलली आहेत. ‘लोकमत’मध्ये आठवडाभरापासून सुरू असलेल्या ‘सांगली जिल्ह्याला नशेखोरीचा विळखा’ या मालिकेची गंभीर दखल घेत टास्क फोर्स नियुक्तीचे आदेश त्यांनी दिले. ‘बंद उद्योगांत चाललेय काय?’ या वृत्ताचीही दखल घेत त्यांनी जिल्हाभरातील बंद कारखान्यांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत.
सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीचा अर्धाअधिक वेळ ड्रग्जविषयक चर्चेतच गेला. सर्वच आमदार व खासदारांनी हा विषय उचलून धरला. ड्रग्जसारख्या गुन्हेगारी कृत्याची जिल्ह्याला पार्श्वभूमी नसताना सध्या सापडत असलेल्या साठ्यांमुळे जिल्ह्याची बदनामी होत असल्याचा आरोप आमदार डाॅ. विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर आणि सुहास बाबर यांनी केला. अन्न, औषध प्रशासन आणि पोलिस डोळेझाक करीत असल्याची तक्रार केली.
डॉ. कदम म्हणाले, विटा येथे ड्रग्जचा कारखाना नव्याने सुरू झालेला नाही. तो बेकायदेशीरीत्या सुरू राहिला, पण त्याची वेळीच तपासणी झाली नाही. या स्थितीत अन्न व औषध प्रशासन नेमकी कशाची तपासणी करते, असा प्रश्न आहे.
आमदार बाबर म्हणाले, विटा येथे अमली पदार्थाचा साठा आढळणे गंभीर आहे. विविध शहरांमध्ये नशेची औषधे राजरोस तयार केली जात आहेत. नशेखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत. गोपीचंद पडळकर, अरुण लाड यांनीही कारवाईची मागणी केली.
माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस
पालकमंत्री पाटील यांनी यावर ठोस कार्यवाहीची ग्वाही दिली. पत्रकार बैठकीत ते म्हणाले, नशेखोरी रोखण्यासाठी टास्क फोर्स नियुक्त केले आहे. त्याची बैठक प्रत्येक महिन्याला होईल. कारवाईचा आढावा घेतला जाईल. ड्रग्जची माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस मी वैयक्तिक पातळीवर देणार आहे. विटा येथील साठ्यावर कारवाईसाठी चौघांना प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस दिले आहे.
पालकमंत्री म्हणाले..
- बंद कारखान्यांची झाडाझडती घ्या.
- माहिती देणाऱ्यांना बक्षीस, पोलिसांना सुविधा आणि प्रबोधन हा त्रिस्तरीय कार्यक्रम
- टास्क फोर्समध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व औषध निरीक्षक
- शाळांबाहेरील टपऱ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री चालणार नाही.
- सांगली आणि पुुण्यातील ड्रग्ज गुन्ह्यांविषयी मी गंभीर