निलंबित घनवट, दीपक पाटीलला मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:24 PM2017-10-30T15:24:12+5:302017-10-30T15:40:40+5:30

वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचा या मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

Suspended motion, notices for disclosure of property to Deepak Patil | निलंबित घनवट, दीपक पाटीलला मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा

निलंबित घनवट, दीपक पाटीलला मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा

Next
ठळक मुद्देसव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी चौकशी सुरू अटकेतील निलंबित संशयितांची मालमत्ता उत्पन्नापेक्षा जास्त शरद कुरळपकर याला फरारी घोषित करण्याच्या हालचाली

सांगली ,दि. ३० : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचा या मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.


दरम्यान, घटनेपासून गायब असलेला सहायक पोलिस फौजदार शरद कुरळपकर याला फरारी घोषित करण्याच्या हालचाली सीआयडीने सुरु केल्या आहेत.


वारणानगर चोरी प्रकरणात विश्वनाथ घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, दीपक पाटील, शंकर पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र माने यांच्यासह मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्यावर कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

कुरळपकर सोडला तर सर्व संशयित तीन महिन्यांपूर्वी सीआयडीला शरण आले आहेत. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन दिवसापूर्वी सीआयडीने घनवट, चंदनशिवे, दीपक पाटील व कुलदीप कांबळे यांच्याविरुद्ध १२७० पानांचे दोषारोपपत्र पन्हाळा न्यायालयात सादर केले आहे.

शासकीय पदाचा गैरवापर, वरिष्ठांना चोरीचा चुकीचा अहवाल सादर करुन शासनाची दिशाभूल व चोरीचा कट, स्थावर मालमत्ता यासह तपासातील अन्य बाबींचा दोषारोपपत्रात समावेश आहे. अन्य संशयितांविरुद्धही दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


दोन वर्षापूर्वी घनवट, चंदनशिवेसह सातजणांनी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये मैनुद्दीन मुलाच्या झोपडीवजा घरात छापा टाकून सव्वातीन कोटींची रोकड जप्त केली होती. चौकशीत मुल्लाने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली.

घटवट टीमने मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरमध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. पण प्रत्यक्षात कारवाईवेळी त्यांनी संगनमताने तीन कोटी १८ लाख रुपये हडप केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याअनुषंगाने सीआयडीचा गेल्या सहा महिन्यांपासून तपास सुरु आहे.

संशयितांच्या घरावर छापे टाकून दोन-दोन तास झडती घेतली. घरातील सदस्यांकडे मालमत्तेबाबत चौकशी केली आहे. त्यांची बँक खातीही तपासण्यात आली आहेत.

अटकेतील घनवट व दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. ही जादा मालमत्ता कोठून आली? याचा पुराव्यासह खुलासा करण्याची नोटीस दोघांनाही बजावण्यात आली आहे. शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांचीही मालमत्ता तपासणी जात आहे.

कुरळपकर गेला कुठे?

शरद कुरळपकर हा गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूर सीआयडीला गुंगारा देत पसार आहे. घनवटसह पाचजणांना अटक झाल्यानंतर तोही शरण येईल, अशी सीआयडीला अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

सांगली व कोल्हापूर सीआयडीने त्याचा संयुक्तरित्या शोध घेतला, तरीही त्याचा कुठेच सुगावा लागला नाही. शेवटी त्याला कायद्याचा हिसका दाखविण्याची तयारी सीआयडीने सुरु ठेवली आहे. त्याला फरारी घोषित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानंतर त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Web Title: Suspended motion, notices for disclosure of property to Deepak Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.