विट्यात विवाहितेची आत्महत्या, दोन चिमुरड्यासह घेतली विहिरीत उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:21 IST2022-02-07T17:25:13+5:302022-02-07T18:21:54+5:30
यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही घटना किरकोळ घरगुती वादातून झाल्याचे समजते

विट्यात विवाहितेची आत्महत्या, दोन चिमुरड्यासह घेतली विहिरीत उडी
विटा (सांगली) : सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील शाहूनगर उपनगरात वास्तव्यास असलेल्या विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय २६) या महिलेने तिची मुलगी आरोही (४) व एक महिन्याच्या बाळाला घेऊन विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली.
विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील शाहूनगर परिसरातील नगरपालिका शाळा नं. १३ जवळ हात्तेकर कुटुंब भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी विवाहिता सोनाली हत्तेकर ही आपली चार वर्षाची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घरातून बाहेर पडली. त्यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र सोनाली व दोन चिमुरडे कुठेही आढळून आले नाहीत.
त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या विहिरीत एका महिलेने दोन चिमुरड्यासह आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी समजली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, उपनिरीक्षक पांडूरंग कन्हेरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विवाहिता सोनाली हिच्यासह तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसून आले.
यावेळी पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून विटा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. दरम्यान, या घटनेतील मृत विवाहितेचा पती बिहुदेव हा मजुरीचे काम करत आहे. यामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही घटना किरकोळ घरगुती वादातून झाल्याचे समजते. या घटनेने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.