Sangli: शक्तिपीठ महामार्ग मोजणीची नोटीस थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन; मिरजेत निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:56 IST2025-10-29T15:55:39+5:302025-10-29T15:56:14+5:30
मुख्यमंत्र्यांनी सांगली-कोल्हापूर जिल्हा महामार्ग मार्गातून वगळण्याचे संकेत दिले असूनही स्थानिक प्रशासन नोटिसा देत आहे. त्यामुळे हा त्रास थांबवावा

Sangli: शक्तिपीठ महामार्ग मोजणीची नोटीस थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन; मिरजेत निदर्शने
मिरज : शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या मोजणी प्रक्रियेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोजणी नोटिसा थांबवाव्यात, अन्यथा प्रांताधिकारी कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीतर्फे मिरजेत मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
कृती समितीचे महेश खराडे व सतीश साखळकर व शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात वारंवार मोजणीच्या नोटिसा देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. या नोटिसांमुळे शेतकऱ्यांना आपली शेतीची कामे थांबवून वेळ व पैसा दोन्ही खर्च होत आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी लेखी स्वरूपात प्रांत कार्यालयात, तसेच मोजणी अधिकाऱ्यांना “आमची शेती महामार्गासाठी द्यायची नाही” असे लेखी कळवले आहे. तरीही नोटिसा देण्याचे प्रकार सुरूच असल्याची तक्रार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगली-कोल्हापूर जिल्हा महामार्ग मार्गातून वगळण्याचे संकेत दिले असूनही स्थानिक प्रशासन नोटिसा देत आहे. त्यामुळे हा त्रास थांबवावा, अन्यथा सर्व शेतकरी प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला. याप्रसंगी प्रवीण पाटील, दिनकर साळुंखे पाटील, उमेश एडके, रघुनाथ पाटील, विक्रम पाटील, विष्णू पाटील, अधिक पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत शेती देणार नाही. हा आमचा ठाम निर्णय आहे. तरीही त्रास सुरूच राहिला तर आत्मदहन करावे लागणार आहे, त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना