सांगलीत उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, महापालिकेच्या महासभेत मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:48 IST2025-08-22T18:48:02+5:302025-08-22T18:48:17+5:30
अखेर महापालिकेने पुतळ्यासाठी जागा निश्चित केली

सांगलीत उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, महापालिकेच्या महासभेत मान्यता
सांगली : शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सामाजिक संघटनांकडून आंदोलन उभे केले होते. अखेर महापालिकेने पुतळ्यासाठी जागा निश्चित केली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील महापालिकेच्या त्रिकोणी बागेत पुतळा उभारण्यावर गुरुवारी महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.
महापालिकेची महासभा व स्थायी समिती सभा आयुक्त सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, नीलेश देशमुख, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, नीलेश जाधव, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा आयुक्त सचिन सांगावकर, अनिस मुल्ला, सहदेव कावडे, नकुल जकाते उपस्थित होते.
शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चासह अनेक संघटनांनी आंदोलने केली होती. पुतळ्यासाठी प्रतापसिंह उद्यानातील जागाही निश्चित करण्यात आली, पण तांत्रिक अडचणीमुळे हा प्रस्ताव बारगळला होता. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा हा विषय ऐरणीवर आला.
अखेर महापालिकेच्या त्रिकोणी बागेत पुतळा उभा करण्याचा प्रस्ताव शहर अभियंत्यांना महासभेकडे दिला. त्याला गुरुवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभेत महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राकडे रक्त चाचण्यासाठी नवीन मशीन खरेदी करण्यात आले आहे. त्याबाबतचे दरही निश्चित करण्यात आले.
स्थायी समितीत शुद्ध पाणी वितरणासाठी अत्याधुनिक वेब मॉनिटरिंग ऑटोमेशन व कंट्रोल सिस्टिम पुरविण्याची निविदा रद्द करण्यात आली. महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्यातून विविध कामांची ६०० कोटींची निविदा काढण्यात आली आहे. या कामासाठी नियुक्त निवृत्त अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना मुदतवाढ देण्यात आली.
ठेकेदार काळ्या यादीत
महापालिकेकडील आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत पाच ठिकाणी दवाखाने उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सार्थक मोटे या ठेकेदाराने निविदा भरली होती, पण त्यांनी निविदा मंजुरीनंतर सिक्युरिटी डिपॉझिटचा डी. डी, बँक गॅरंटी न दिल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. या कामाची फेरनिविदा काढण्यात येणार आहे.