राज्य साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे हृदयविकाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:45 IST2025-05-03T15:44:53+5:302025-05-03T15:45:09+5:30
साखर कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपल्याची भावना

राज्य साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे हृदयविकाराने निधन
इस्लामपूर : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस,राज्यातील साखर कामगारांचे जेष्ठ नेते शंकरराव रामचंद्र भोसले (वय ७४ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते राज्यातील साखर कामगारांची पगार वाढ निश्चित करणाऱ्या राज्य शासन, साखर संघ व कामगार संघटनेच्या त्रिपक्षीय समितीचे सदस्य होते. कासेगावचे सरपंच म्हणून त्यांनी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे.
कासेगाव (ता.वाळवा) येथे शुक्रवारी सायंकाळी फिरून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर कासेगाव येथील कृष्णा नदीच्या तिरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील यांच्यासह साखर उद्योग व विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा, विवाहित दोन मुली,भाऊ-चुलतभाऊ, पुतणे असा एकत्रित मोठा परिवार आहे.
भोसले सर यांनी सुरवातीच्या काळात राजारामबापूंच्या समवेत काम केले. कासेगावचे सरपंच म्हणून त्यांनी गावच्या विकासासाठी आपले मोलाचे योगदान दिले. साखर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक मोर्चे, आंदोलने उभी केली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. -जयंत पाटील, आमदार