रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सांगली, कोल्हापुरातून मुंबईसाठी विशेष गाड्या धावणार, जाणून घ्या वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 18:00 IST2025-08-07T17:58:30+5:302025-08-07T18:00:01+5:30
प्रवाशांची सोय

संग्रहित छाया
सांगली : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दीर्घ सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने बुधवारी प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सांगली व किर्लोस्करवाडीमार्गे विशेष एक्सप्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.
या विशेष गाड्या सांगली जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असून मुंबई आणि कोल्हापूरमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’ या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.
सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ घेणाऱ्या सांगलीकरांनी जाताना व येताना तिकिटावर सांगली स्थानकाचा उल्लेख करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अशा धावणार विशेष गाड्या
मुंबई सीएसएमटी ते कोल्हापूर (गाडी क्र. ०१४१७) ही विशेष गाडी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता मुंबई सीएसएमटीहून निघेल. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता सांगली स्थानकावर येईल. ८:१० वाजता कोल्हापूरसाठी रवाना होऊन कोल्हापूरला १०:१५ वाजता पोहोचेल.
कोल्हापूर ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र. ०१४१८) ही विशेष गाडी दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी ४:४० वाजता कोल्हापूर येथून निघेल. ५:४७ वाजता सांगली स्थानकावर पोहोचेल व ५:५० वाजता मुंबईकडे प्रयाण करेल. ही गाडी ११ ऑगस्ट रोजी पहाटे ४:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
याठिकाणी थांबे मंजूर
दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज अशी मधील स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.
अशी आहे गाडीची रचना
- एसी-३ टियर डबे : २
- स्लीपर डबे : १२
- जनरल सेकंड क्लास : ६
- सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन २