Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:22 IST2025-10-21T18:21:06+5:302025-10-21T18:22:47+5:30
मिरजेत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल; सासू गंभीर जखमी

Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले
मिरज : घरात मद्यपान व मांसाहारास सासूने विरोध केल्याने जावयाने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारून तिचे डोके फोडले. यात सासू मेघना किशोर क्षीरसागर या गंभीर जखमी झाल्या. मिरजेत खतीबनगर परिसरात ही घटना घडली. आरोपी जावई अक्षय रमेश कबाडे याच्याविरुद्ध गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) रात्री सुमारे अकरा वाजता अक्षय हा सासरी गेला होता. त्यावेळी त्याने घरात दारू पिण्यास व मांसाहार करण्यास सुरुवात केली. यावर मेघना यांनी विरोध करीत “दारू प्यायची व मांसाहार करायचा असल्यास घराबाहेर जाऊन करा,” असे बजावले.
या कारणावरून अक्षय याने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारला. यामुळे मेघना क्षीरसागर या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जावई अक्षय कबाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.