Sangli: जावयाचा सासूवर सत्तूरने वार करून खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:14 IST2025-01-13T12:13:50+5:302025-01-13T12:14:06+5:30
विटा : मुलीस पाहिले ना, आता जा, असे म्हणाल्याचा राग मनात धरून जावयाने सासूवर सत्तूरने हल्ला करून तिचा खून ...

Sangli: जावयाचा सासूवर सत्तूरने वार करून खुनाचा प्रयत्न
विटा : मुलीस पाहिले ना, आता जा, असे म्हणाल्याचा राग मनात धरून जावयाने सासूवर सत्तूरने हल्ला करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बामणी (ता. खानापूर) येथे घडली. या हल्ल्यात वैशाली अर्जुन कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून हल्लेखोर जावई ऋषीकेश अशोक कुंभार (रा. जुना देगाव नाका, साठे-पाटील वस्ती, सोलापूर) याच्याविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बामणी येथील वैशाली कुंभार यांची मुलगी ऋतुजा हिचा विवाह ऋषीकेश कुंभार याच्याशी झाला होता. त्यांना मुलगी आहे. परंतु, या दोघांच्या घटस्फोटासाठी विटा न्यायालयात खटला सुरू आहे. शुक्रवारी दुपारी संशयित ऋषीकेश हा पत्नी व सासू राहत असलेल्या बामणी येथील उदगिरी हॉटेलवर आला. त्यावेळी त्याने मला माझ्या मुलीला पाहायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने सासू वैशाली यांनी तुमचे मुलीला पाहून झाले असेल तर आता इथून जा, असे सुनावले.
त्यामुळे त्याचा राग आल्याने तू माझा संसार मोडतेस, तुला आता जिवंत ठेवत नाही, असे म्हणून पाठीत अडकवून आणलेला सत्तूर शर्टातून बाहेर काढून सत्तूरने सासू वैशाली यांच्या मानेवर, पाठीत तसेच डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी करीत खून करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पत्नी ऋतुजा ऋषीकेश कुंभार यांनी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ऋषीकेश कुंभार याच्याविरुद्ध पोलिसांत बीएनएस कलम १०९, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक जालिंदर पळे पुढील तपास करीत आहेत.