Sangli Accident: आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:53 IST2025-11-01T15:52:57+5:302025-11-01T15:53:28+5:30
मायलेकांवर पाठोपाठ अंत्यसंस्कार करताना अश्रूही थिजले

Sangli Accident: आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असलेल्या मुलावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार
सचिन ढोले
समडोळी : आईच्या मृत्यूनंतर तिच्या आठवणींनी घायाळ झालेले हृदय अन् डोळ्यातून ओघळणारे अश्रू घेऊन तो अंत्यदर्शनासाठी निघाला. दुसरीकडे मुलाची प्रतीक्षा करीत कुटुंब अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते. इतक्यात मुलाच्या अपघाताची वार्ता कानावर पडताच कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार अन् सारे गाव शोकसागरात बुडाले.
मिरज तालुक्यातील समडोळी येथे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. मृणालिनी किरण कुदळे (वय ५५) यांचे गुरुवारी पहाटे साडेपाच ते सहाच्या दरम्यान निद्रावस्थेतच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले. मात्र, या वेदनांच्या जखमा ओल्या असतानाच त्याचदिवशी मृणालिनी यांचा पुत्र सौरभ किरण कुदळे (वय २७, रा. समडोळी) याचाही अपघातीमृत्यू झाला.
आईच्या निधनाची बातमी कळताच सौरभ बेंगलोरहून तातडीने समडोळीकडे निघाला. अभियंता म्हणून एका कंपनीत कार्यरत असलेला हा तरुण आईच्या अंत्यदर्शनासाठी येत होता. मात्र नियतीने क्रूर खेळी खेळली. हुबळी-धारवाड मार्गावर त्याच्या दुचाकीला भीषण अपघात झाला आणि तो जागीच गतप्राण झाला. वडील किरण कुदळे आणि नातेवाइकांवर दुःखाचा असा महाआघात झाला की, अश्रूही थिजले.
सौरभला अपघातानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह गावात पोहोचताच वातावरण शोकाकुल झाले. सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, गावही सुन्न झाले. शनिवारी रात्री आईवर तर शुक्रवारी सायंकाळी सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सकाळी मायलेकांच्या अस्थी विसर्जनाचा विधी पार पडणार आहे. सौरभच्या पश्चात वडील किरण कुदळे, एक भाऊ, आजी, चुलता, चुलती असा परिवार आहे.
दोन गावे शोकसागरात
कुदळे कुटुंब मूळचे दुधगाव (ता. मिरज) येथील. सध्या ते समडोळीत राहतात. त्यामुळे ही दोन्ही गावे या घटनेनंतर शोकसागरात बुडाली. दुधगाव-समडोळीच्या स्मरणात ही घटना दीर्घकाळ कोरली जाईल.