जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले, सांगली जिल्ह्यातील ३० हजार सैनिक भारतमातेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:16 IST2025-05-09T13:15:00+5:302025-05-09T13:16:31+5:30
सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य ...

संग्रहित छाया
सांगली : ‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी’ या गदिमा यांनी लिहिलेल्या गीताच्या ओळी सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आठवल्या जात आहेत. कारण जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर जवळपास ३० हजार सैनिक देशरक्षणार्थ कर्तव्य बजावत आहेत. त्यातील कित्येक जण सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत.
पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक ठार झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. समाज माध्यमातूनही ‘पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांना मारा’ अशा ‘पोस्ट’ चा भडीमार सुरू होता. तशातच ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे युद्धाचे सावट दिसून येते. जिल्ह्यात सुटीवर आलेल्या अनेक जवानांना माघारी बोलवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व जवान सुटी अर्ध्यातच संपवून सीमेवर परतले आहेत. त्यांना निरोप देताना कुटुंबीयांना गलबलून आले.
सुटीवर आलेले जवान परत गेल्यामुळे तसेच सध्या सीमेवर असलेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये युद्धाबाबतच्या अनामिक भीतीचे सावट आहे. समाज माध्यमावर सैनिक सीमेवर जात असल्याचे भावुक व्हिडीओ पाहून अनेकांना जीव तुटत आहे. सैनिक मात्र देशसेवेसाठी अभिमानाने कर्तव्यावर रूजू होण्यासाठी जाताना दिसत आहेत. युद्धाच्या परिस्थितीत कोणतीही वाईट बातमी कानावर पडू नये अशी प्रार्थना सैनिकांचे कुटुंब मनोमन करत आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. आता सैनिकांचा जिल्हा म्हणूनही सांगलीला ओळखले जाते. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार सैनिक देशसेवेसाठी कर्तव्यावर आहेत. त्यापैकी हजारो सैनिक सद्यस्थितीत सीमेवर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व लक्ष सीमेवरील हालचालीकडे आहे. सैनिकाची पत्नी, आई, वडील, मुले, नातेवाईक काळजीत आहेत. त्यांची हूरहूर, काळजी पाहून नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारील मंडळी त्यांना धीर देताना दिसत आहेत. गदिमांच्या गीतातील ‘वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो, परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी’ अशीच अनेकांची अवस्था आहे.
पराक्रमी शूरवीरांचा जिल्हा
भारत-पाक, भारत-चीन युद्धासह वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील वीर जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. आजवर १६० जवान देशरक्षणार्थ शहीद झाले आहेत. ७० जणांना शौर्यपदक मिळाले. एक महावीर चक्र, एक शौर्य चक्र, ३१ सेना / नौसेना / वायूसेना पदके प्राप्त केली आहेत.
२० हजार माजी सैनिक
जिल्ह्यात सद्यस्थितीत १४ हजार ६७५ सैनिक देशाचे रक्षण करून निवृत्त झालेले आहेत. तसेच ६ हजार ९९ सैनिकांच्या विधवा कुटुंबांची जबाबदारी सांभाळत आहेत. तर जवळपास ३० हजार सैनिक कर्तव्यावर असल्याची माहिती जिल्हा सैनिक कार्यालयातून देण्यात आली.