सांगलीतील कडेगावात रंगला गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:21 IST2025-07-07T14:20:59+5:302025-07-07T14:21:18+5:30
हिंदू मानकऱ्यांनी दाखविला सर्व धर्मांचा समन्वय

सांगलीतील कडेगावात रंगला गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा, हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
कडेगाव (जि.सांगली) : कडेगावच्या रस्त्यांवर रविवारी सकाळी पावसाच्या सरी सुरू होत्या, पण त्या सरींमध्ये न भिजणारा जाज्वल्य उत्साह ओथंबून वाहत होता. कडेगावात मोहरमच्या ताबूत भेटीचा ऐतिहासिक सोहळा रंगला होता. हजारो भाविकांच्या साक्षीने, डोळ्यांचे पारणे फेडणारी गगनचुंबी ताबुतांची मिरवणूक आणि भव्य मिलन भेटी सोहळा यंदाही व थाटात पार पडला. ‘महान भारत देश अमुचा घुमवू जय जयकार,’ ‘हिंदू-मुस्लीम साथ रहेंगे, एकी से सागर पार करेंगे,’ अशा घोषणांनी शहराचा आसमंत दुमदुमून गेला.
कडेगावचा मोहरम केवळ धार्मिक अनुष्ठान नसून, तो सामाजिक सलोखा, धार्मिक ऐक्य आणि राष्ट्रप्रेमाचा जिवंत पुरावा आहे. गेली दीडशे वर्षे ही परंपरा जपली जाते. यंदाच्या मोहरम मिरवणुकीने ही परंपरा नव्याने उजळून निघाली. पडत्या पावसातही शिस्तबद्ध आणि सुसंवादात्मक पद्धतीने ताबूत मिरवणुका सुरू झाल्या. सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, निमसोड, सोहोली येथून वाजतगाजत मानकरी दाखल झाले.
मानाचा ‘सातभाई’ ताबूत उचलण्यात आल्यानंतर वीजबोर्ड, पाटील चौक आणि सुरेशबाबा देशमुख मोहरम मैदान या प्रमुख ठिकाणी विविध मानाच्या ताबुतांची भव्य भेट झाली. देशपांडे, हकीम, बागवान, शेटे, अत्तार, इनामदार, सुतार, माईणकर यांचे उंच, आकर्षक ताबूत गर्दीत लखलख चमकले. त्या भेटीचा क्षण म्हणजे साक्षात ‘राम-भरत’ भेटीसारखा हृदयात थेट झंकार उमटवणारा. भाविकांनी आकाशात टोपी-फेटे उंचावत स्वागत केले.
हिंदू मानकऱ्यांनी दाखविला सर्व धर्मांचा समन्वय
ताबुतांची ‘गळाभेट’ पाहताना पावसात चिंब झालेले भाविक डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर श्रद्धेचे तेजोवलय घेऊन थक्क होऊन पाहत राहिले. मुख्य भेटीच्या मैदानात ‘प्यारा प्यारा हमारा देश प्यारा, अब एकीका कर दो पुकारा’ या गीतांतून राष्ट्रीय ऐक्याची साक्ष दिली. हिंदू मानकऱ्यांनी मसूद माता, बारा इमाम पंजे ताबूत आणून साऱ्या धर्मांचा समन्वय दाखविला.