सहा तलाव १०० टक्के भरले; सांगली जिल्ह्यात ४२ टक्क्यांवर पाणीसाठा
By अशोक डोंबाळे | Updated: July 16, 2024 17:31 IST2024-07-16T17:31:16+5:302024-07-16T17:31:37+5:30
शेतकऱ्यांना दिलासा : १७ तलावांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी

सहा तलाव १०० टक्के भरले; सांगली जिल्ह्यात ४२ टक्क्यांवर पाणीसाठा
अशोक डोंबाळे
सांगली : मागील आठवड्यात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने जिल्ह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन ४२ टक्के झाला आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस राहिल्यास जिह्यातील पाझर तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सहा पाझर तलाव १०० टक्के भरले असून १७ तलावांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. दरम्यान, मान्सूनच्या दमदार एण्ट्रीचा खरीप पेरणीला फायदा झाला असून, शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे.
सांगली जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघु प्रकल्प ७८ असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सात हजार ७७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. २९ मे २०२४ रोजी ८३ प्रकल्पांमध्ये एक हजार ४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाण्याची टक्केवारी १३ होती. मागील आठवडाभरात जिल्ह्यात जोरदार मान्सून पावसाचे आगमन झाले.
दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पाझर तलावांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिह्यातील ८३ प्रकल्पांमध्ये सध्या तीन हजार २८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये जवळपास २९ टक्के पाणीसाठा वाढून ४२ टक्के झाला आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस पडत राहिल्यास जवळपास ६० टक्क्यांपर्यंत मध्यम आणि लघु प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. पावसाची दमदार एण्ट्री झाल्यामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यात खरिपाची ९० टक्क्यांवर पेरणी झाली आहे.
अंत्री, वाकुर्डे (ता. शिराळा), तिप्पेहळ्ळी, कोसारी (ता. जत), बंडगरवाडी (ता. कवठेमहांकाळ) आणि आटपाडी हे सहा पाच तलाव १०० टक्के भरले आहेत, तसेच १७ पाझर तलावांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असून १५ तलावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आहे. दहा तलावांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. दहा तलावांमध्ये मृतसाठा असून पावसाळ्यातही खानापूर, आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक आणि जत तालुक्यातील ९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.
जिल्ह्यातील पाझर तलावांतील पाणीसाठा
तालुका - तलाव - पाणीसाठा टक्केवारी
तासगाव - ७ - ७१
खानापूर - ८ - ३७
कडेगाव - ७ - ४९
शिराळा - ५ - ७६
आटपाडी - १३ - ६६
जत - २७ - १९
कवठेमहांकाळ - ११ - २५
मिरज - ३ - ७६
वाळवा - २ - ८
एकूण - ८३ - ४२