Sangli: बारा तासांत दुचाकीवरून ६५२ किमी प्रवास, श्रेया'च्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:39 IST2025-10-31T15:38:18+5:302025-10-31T15:39:14+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील येवले कुटुंबीयांची सून श्रेया शंतनू येवले-पाटील या तरुणीने केवळ १२ तास ४ मिनिटांत ...

Sangli: बारा तासांत दुचाकीवरून ६५२ किमी प्रवास, श्रेया'च्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील येवले कुटुंबीयांची सून श्रेया शंतनू येवले-पाटील या तरुणीने केवळ १२ तास ४ मिनिटांत ६५२ किलोमीटर अंतर दुचाकीवरून पार करत एक विक्रम रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.
श्रेया येवले यांचे माहेर कोल्हापूर असून, त्या छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी करतात. त्यांनी त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून पहाटे ४:३२ वाजता दुचाकीवर प्रवास सुरू केला. त्यांच्या या प्रवासाचा शेवट रात्री ८:१५ वाजता पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात झाला. दरम्यान, त्यांनी ६५२ किलोमीटर अंतर पार केले. त्र्यंबकेश्वर, विघ्नेश्वर, लेण्याद्री, गिरिजात्मक, भीमाशंकर खेड, रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्दिविनायक, मोरगावचा मयुरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, महाडचा वरदविनायक करत पालीच्या बल्लाळेश्वरापर्यंत १५ तास ४८ मिनिटे कालावधी लागला होता तर प्रत्यक्षात १२ तास ४ मिनिटांत ६५२ किलोमीटरचे अंतर पार करत भारत रेकॉर्ड बुकमध्ये आपली कामगिरी नोंदवली आहे. 
या राईडमध्ये तिने आठ अष्टविनायक, दोन ज्योतिर्लिंग आणि खंडोबाला एकचक्रे प्रदक्षिणा घातली आहे. या प्रवासात श्रेया हिने गाडीचे इंधन भरणे व मंदिरांमध्ये काही काळ थांबलेली होती. त्यामुळे तिने प्रत्यक्षात १२ तास ४५ मिनिटांमध्ये ही राईड पूर्ण केली. श्रेया यांना दुचाकी राईडची पहिल्यापासूनच आवड आहे. महिलांना दुचाकीवरून लांब प्रवास करणे कठीण आहे, असे समजले जात होते; परंतु महिलांमध्ये ती क्षमता असून, हे महिलाही करू शकतात, हे दाखवून देण्याचा श्रेयाने निर्धार केला. त्यामुळेच त्यांनी ही दुचाकी राईड करण्यात ती यशस्वी झाली.
अनेकदा महिलांना ‘तू हे करू शकत नाहीस’ असे सांगितले जाते; पण त्या सर्वांना आपल्या क्षमतेचा दाखला देत श्रेया यांनी दाखवून दिले की महिलाही कठीण वाटणारे उद्दिष्ट पूर्ण करू शकतात. या यशस्वी राईडसाठी पती शंतनू येवले, सासरे आनंदराव येवले, माहेरचे पाटील कुटुंबीय व रायडर सन्मेष व्होरा यांचे मार्गदर्शन लाभले. - श्रेया येवले-पाटील