सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:33 IST2025-04-23T18:33:25+5:302025-04-23T18:33:47+5:30
जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार

सांगलीतील चार माजी आमदार अखेर राष्ट्रवादीत, मुंबईत झाला पक्षप्रवेश
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार धक्का देत सांगली जिल्ह्यात पक्ष मजबूत केला. चार माजी आमदारांसह, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती, काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंगळवारी मुंबई येथे प्रवेश केला.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, निशिकांत पाटील, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू होत्या. अखेर मंगळवारी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
तम्मनगौडा रवी पाटील भाजप नेते असून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आहेत. जतमधून त्यांना भाजपने विधानसभा उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आजच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जाते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीत त्याचे परिणाम दिसून येतील.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश सुरु झाले आहेत. या चार माजी आमदारांसह मुन्ना कुरणे, संग्राम जगताप, रणधीरसिंह नाईक, पलूसचे नीलेश येसुगडे, निवृत्ती शिंदे, प्रमोद सावंत, अनिल पाटील आदींनी पक्षप्रवेश केला.
जिल्हा मंत्रिपदापासून वंचित : अजित पवार
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत सांगली जिल्ह्याला सातत्याने चांगली मंत्रिपदे मिळत होती. पण गेल्या काही वर्षांत राजकीय उलथापालथी झाल्या. जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला. आता भविष्यात फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारसरणीने राजकीय वाटचाल करु. प्रवेश केलेल्या नेत्यांना भविष्यात संधी देऊ.