मुख्यमंत्री दौऱ्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजीने तणावाची स्थिती; पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:51 PM2021-08-02T14:51:19+5:302021-08-02T15:04:09+5:30

ShivSena And BJP : शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

Shiv Sena-BJP workers clash during CM uddhav thackeray visit in Sangli | मुख्यमंत्री दौऱ्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजीने तणावाची स्थिती; पोलिसांकडून लाठीमार

मुख्यमंत्री दौऱ्यात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले; घोषणाबाजीने तणावाची स्थिती; पोलिसांकडून लाठीमार

googlenewsNext

सांगली - शहरातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सोमवारी सांगलीत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी निवेदन देण्यावरून एकच गोंधळ उडाला. निवेदन देता न आल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडले. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला होता. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

मुख्यमंत्री ठाकरे हे सोमवारी सांगली दौऱ्यावर होते. दुपारी बारा वाजता त्यांनी आयर्विन पुलावरून कृष्णा नदीकाठची पाहणी केली. त्यानंतर ते हरभट रोडकडे रवाना झाले. हरभट रोड येथील चौकात शिवसेना, भाजप, व्यापारी एकता असोसिएशन, सर्वपक्षीय कृती समिती, गुंठेवारी समितीसह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी थांबले होते. त्यांच्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे गाडीतून उतरून येत असतानाच कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला. एकमेकांना धक्काबुक्की सुरू झाली. पोलिसांनाही हा गोंधळ थांबविता आला नाही. दोन मिनिटातच निवेदन न घेताच ठाकरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीसाठी रवाना झाले.

मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविताच भाजपचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी, मुन्ना कुरणे, दीपक माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्र्याचा धिक्कार करीत पूरग्रस्तांचा अवमान केल्याचा आरोप केला. भाजप कार्यकर्त्यांनी चौकात ठाण मांडले. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी भाजप आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेचे शंभोराज काटकर, विशालसिंह रजपूत, संजय काटे व इतर कार्यकर्तेही त्यांच्या दिशेने धावून आले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला’, अशी घोषणाबाजी करीत भाजपची दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवून घटनास्थळापासून लांब नेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत एकमेकांशी भिडले. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

काहींचा शंखध्वनी, तर काहीजण वाहनाकडे धावले

निवदेत देताना उडालेला गोंधळ पाहून मुख्यमंत्री ठाकरे हे वाहनात बसले. धामणीचे विठ्ठल पाटील हे निवेदन देण्यासाठी त्यांच्या गाडीसाठी धावले. वाहनाच्या काचेवर हातही मारला. सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकरही मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे गेले. पण तोपर्यंत ताफा निघून गेला. त्यामुळे साखळकर यांनी शंखध्वनी करीत निषेध केला. त्यांनी निवेदनही भिरकावले.

पोलिसांनी दाखविला संयम

हरभट रोड चौकात सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह ५० हून अधिक पोलिस तैनात होते. शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते भिडल्यानंतर सिंदकर यांनी दोघांची समजूत काढून पुढील अनर्थ टाळला. पोलिसांनीही संयमाची भूमिका घेतली. शिवसेना कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Shiv Sena-BJP workers clash during CM uddhav thackeray visit in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.