सांगलीवर पसरली धुक्याची चादर; हवामानात अचानक बदल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:34 AM2019-12-13T10:34:56+5:302019-12-13T10:35:19+5:30

सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे.

A sheet of smoke spread over Sangli; A sudden change in climate | सांगलीवर पसरली धुक्याची चादर; हवामानात अचानक बदल 

सांगलीवर पसरली धुक्याची चादर; हवामानात अचानक बदल 

Next

सांगली : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानातील लहरीपणाचा अनुभव नागरिकांना येत आहे. सांगली शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे ६ ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. निसर्गाची वेगवेगळी रुपे एकाच दिवसात दिसू लागली आहेत.

सांगली शहरात शुक्रवारी पहाटे सहा वाजल्यापासून साडे नऊ वाजेपर्यंत धुक्यांची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणा-या नागरिकांसह, शाळकरी मुले, व्यावसायिक यांना धुक्यांमधून वाट शोधत जावे लागले. दाट धुके असल्यामुळे पहाटे तुरळक वाहतूक असूनही वाहनांना सावकाश जावे लागत होते. दहा वाजल्यानंतर सूर्यदर्शन झाले. शनिवारीही अशीच परिस्थिती असण्याचा अंदाज आहे.

सकाळ दाट धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. गुरुवारी दुपारी शहरासह जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३१ अंशापर्यंत गेले होते. गेल्या आठवड्यात उकाडा आणि थंडी असे दोन्ही अनुभव एकाच दिवसात येत होते. आता धुके आणि कडक उन्हाचा खेळ सुरू झाला आहे. 

भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार आगामी चार दिवस तापमानात मोठे चढ-उतार अनुभवास येतील. १५ डिसेंबरपर्यंत जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान १७ अंशापर्यंत जाणार आहे. त्यानंतर  जिल्ह्याच्या काही भागात तापमान आणखी घटण्याची चिन्हे आहेत. हवामानाचा हा लहरीपणा आता आणखी काही दिवस नागरिकांना सोसावा लागणार आहे.

Web Title: A sheet of smoke spread over Sangli; A sudden change in climate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली