Sangli: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार, दोन अपत्ये होऊनही फसवणूक केल्याने गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:55 IST2025-07-26T17:52:58+5:302025-07-26T17:55:20+5:30
‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा एक वर्षाचा करार केला

Sangli: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार, दोन अपत्ये होऊनही फसवणूक केल्याने गुन्हा
सांगली : लग्नाच्या आमिषाने तरुणीशी चार वर्षे शारीरिक संबंध ठेवून दोन अपत्ये झाली तरी लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने संशयित अमित प्रल्हाद कांबळे (वय ३६, रा. सैनिकनगर, वानलेसवाडी) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित तरुणी आणि संशयित अमित यांची २०१९ मध्ये ओळख झाली होती. दोघांचे प्रेमसंबंध जुळून आल्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत एका भाड्याच्या खोलीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ चा एक वर्षाचा करार पीडितेशी केला. दोघेजण वर्षभर राहिले. दोघांचा एक वर्षाचा करार संपल्यानंतरही अमित याने पीडितेशी लग्न न करता सैनिकनगर येथे स्वत:च्या घरात जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
तसेच या काळात त्याने पहिले लग्न झाल्याची माहिती देखील पीडितेपासून लपवून ठेवली. पीडितेने फेब्रुवारी २०१९ ते १२ डिसेंबर २०२३ या काळात दोन मुलांना जन्म दिला. तिने अमित याला वारंवार लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आपले सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर जून २०२५ मध्ये लग्न करू असे आश्वासन दिले. त्यानुसार जून २०२५ मध्ये पीडितेने अमितला लग्नाविषयी विचारणा केली. तेव्हा त्याने पीडितेशी वाद घालून लग्नास नकार दिला.
पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून अमित कांबळे याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. तर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.