सांगली येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलक घुसले कसे?; जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा धारेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:33 IST2025-12-17T18:32:17+5:302025-12-17T18:33:50+5:30
दोषींवर कारवाईचे संकेत

सांगली येथील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलक घुसले कसे?; जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा धारेवर
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्यावेळी काही आंदोलकांनी निषेधाचे फलक हाती घेत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस व जिल्हा प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलक घुसले कसे? असा जाब वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनानेही दोषींवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मनसे व सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्ह्यात भयमुक्त, नशामुक्त अभियान सुरू आहे. काही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी वेळ मागितली होती. पण जिल्हा प्रशासन व पोलिसांनी त्यांना भेट नाकारली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बाधा नको म्हणून नशामुक्त अभियानाचे निमंत्रक तानाजी सावंत, सतीश साखळकर, शंभुराज काटकर, उमेश देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
दरम्यान, दुपारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कवलापूर विमानतळावर आले. तेथून त्याचा ताफा संजयनगरच्या दिशेने रवाना झाला. यावेळी संजयनगर हद्दीत काही आंदोलकांनी फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाले. काही जणांनी कार्यक्रमस्थळी सुरक्षा यंत्रणा भेदून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलकांनी निषेध घोषणा दिल्याने जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणेवर हलगर्जीपणा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागविल्याचेही समजते आहे. सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी, अंमलदारांची बैठक घेतल्याचेही समजते. लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळतात. आता संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.