बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:31 IST2022-06-02T19:30:53+5:302022-06-02T19:31:28+5:30

इस्लामपूर येथील सोयाबीन बियाणे उत्पादकावर कृषी विभागाने मंगळवारी कारवाई केली. पण, अशा बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.

Seed black market in full swing, Neglected by agriculture officials during the Ain season | बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात

बियाणांचा काळाबाजार जोमात, ऐन हंगामामध्ये शेती अधिकारीच कोमात

अशोक डोंबाळे

सांगली : खरीप हंगाम सुरू झाला की बोगस बियाणे, रासायनिक खत आणि कीटकनाशक उत्पादकांचे पेव फुटते. नामांकित कंपन्यांच्या नावावर विक्री करून उत्पादक नामानिराळे होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गलेलठ्ठ पगार देऊन ठेवलेले अधिकारी मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. भांडवलदार कंपन्यांपुढे टिकाव लागत नसल्यामुळे वर्षानुवर्षे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

जिल्ह्यात खरिपाची सव्वाचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. मान्सून पाऊस वेळेत येणार असल्यामुळे बियाणे, खते घेण्यासाठी गडबड सुरू आहे. ही वेळ साधून बोगस बियाणे, खते उत्पादकांनी बाजारात काळाबाजार सुरू केला आहे. इस्लामपूर येथील सोयाबीन बियाणे उत्पादकावर कृषी विभागाने मंगळवारी कारवाई केली. पण, अशा बोगस बियाणे उत्पादन करणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.

‘हैदराबाद मेड’ पद्धतीच्या कीटकनाशकांची जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कृषी सल्लागारामार्फत थेट शेतकऱ्यांना ती विकली जातात. या कृषी सल्लागारांमध्ये काही कृषी विभागाचे अधिकारीच आहेत. याकडे कृषी विभागाच्या भरारी पथकांची नजर जात नाही. रासायनिक खतांमध्येही बोगसगिरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही नामांकित विक्रेत्यांकडूनही अशा खतांचा पुरवठा होत आहे. कृषी औषधे, खते आणि बियाणे विकणाऱ्या नामांकित दुकानांच्या तपासणीपूर्वीच अधिकाऱ्यांचा त्यांना ‘फोन’ जातो! मग शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, कीटकनाशके आणि खते कसे मिळणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्यासाठी आलेले खत कर्नाटकात

जिल्ह्यात डीएपीसह रासायनिक खताची टंचाई निर्माण होईल, असा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या परिस्थितीमध्ये जिल्ह्यासाठी आलेली रासायनिक खते मिरज तालुक्यातील सलगरेमार्गे कर्नाटकात जातात. सांगली शहरातील रासायनिक खतांचे काही मुख्य विक्रेतेच त्यात सामील आहेत. कृषी विभागाची भरारी पथके त्याकडे कानाडोळा करतात.

आटपाडी तालुक्यातील ९०४ शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?

आटपाडी तालुक्यातील ९०४ शेतकऱ्यांनी ३१८.९८ हेक्टर क्षेत्रात लागवड केलेले कापसाचे बियाणे बोगस असल्याने सुमारे २० कोटींचे नुकसान झाले होते. ही घटना २०१५ या वर्षातील आहे. या शेतकऱ्यांना गेल्या सात वर्षांत एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. विधानसभेत लक्षवेधी होऊनही काही उपयोग झालेला नाही.

उन्हाळी सोयाबीन बियाण्यांतही फसवणूक

उन्हाळी सोयाबीन बियाण्यांतही वाळवा आणि पलूस तालुक्यातील १२५ हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सोयाबीन टोकण झाल्यानंतर रोपांना सोयाबीन आलेच नाही. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी बियाणे निकृष्ट असल्याचा अहवाल दिला. पण, भरपाई कोण देणार, असा प्रश्न आहे. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी बैठका घेऊनही कंपनी भरपाई देण्यासाठी फारशी इच्छुक नसल्याचे समजते.

Web Title: Seed black market in full swing, Neglected by agriculture officials during the Ain season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.