‘जेल की दिवारे उंची करवा लो जेलरसाब..!; सांगली कारागृहातून आरोपी पळाल्याने सुरक्षेलाच धोका
By घनशाम नवाथे | Updated: November 15, 2025 19:28 IST2025-11-15T19:27:25+5:302025-11-15T19:28:13+5:30
पळालेल्या ठिकाणी टॉवरचा प्रस्ताव

‘जेल की दिवारे उंची करवा लो जेलरसाब..!; सांगली कारागृहातून आरोपी पळाल्याने सुरक्षेलाच धोका
घनशाम नवाथे
सांगली : ‘दिवारे ऊंची करवा लो मेजरसाब..मै एकही छलांग मे भाग जाऊंगा’ हा हिंदी चित्रपटातील डायलॉग काहीवर्षापूर्वी चांगलाच गाजला होता. चित्रपटातील खलनायकाप्रमाणे जिल्हा कारागृहातील आरोपीने कारागृहाच्या तटबंदीवरून पळून खंदकात उडी घेत पलायन करत सुरक्षेलाच आव्हान दिले आहे. आता डायलॉगप्रमाणे आता ‘दिवारे ऊंची करवा लो जेलरसाब’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कारागृहाचे नाव काढले तरी अनेक गुन्हेगारांचा थरकाप उडतो असे म्हंटले जाते. कारागृहातील कडक शिस्त आणि सुरक्षा यंत्रणा पाहून अनेकांच्या मनात धडकी भरते. मोठे कुख्यात गुन्हेगार येथे सुतासारखे सरळ होतात. सांगलीतील कारागृह तर ब्रिटिशकालीन आहे. परंतु या कारागृहाच्या सुरक्षेलाच धोका निर्माण झाला आहे. कारागृहाभोवती अपार्टमेंट, शाळा, नागरी वस्ती याचा विळखा पडला आहे. कारागृहाच्या आग्नयेकडील कोपऱ्याजवळील जागेचा वाद सुरू आहे. तेथे तटबंदीच नाही.
त्यामुळे कारागृहातील खुनातील आरोपी अजय भोसले याला साफसफाईसाठी बाहेर काढल्यानंतर तो दोन तटबंदीमधील गवतातून पळत आला. त्यानंतर पडलेल्या तटबंदीजवळ पळत आला. तेथून अवघ्या सात-आठ फुटांवरील खंदकावरून खाली उडी ठोकत अंगावरील शर्ट, चप्पल टाकून देत पलायन केले. एकीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, तटबंदीच्या जाळीमध्ये सोडलेला विद्युतप्रवाह, उंच टॉवरवरील पहारा आणि शस्त्रधारी कर्मचाऱ्यांची नजर अशी सुरक्षा यंत्रणा असताना ती भेदून खुनातील आरोपीने पलायन केल्यामुळे कारागृहाची सुरक्षा यंत्रणा चव्हाट्यावर आली आहे. तटबंदीच्या उंच भिंती आणि खोलवर असलेला खंदक सुरक्षेसाठी अपुरा पडत आहे. तीन वर्षांत दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यामुळे कारागृहाची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे राहिले आहे.
तीन वर्षांपूर्वीही खुनातील आरोपीचे पलायन
तासगाव येथील खूनप्रकरणी कारागृहात असलेल्या सुनील ज्ञानोबा राठोड (रा. यळगोड, जि. विजयपूर) याने तीन वर्षांपूर्वी हॉस्पिटलच्या छतावर चढून वैरणबाजारच्या बाजूला असलेल्या खंदकात उडी टाकून पलायन केले होते. त्यानंतर तटबंदीवर तारेचे कंपाऊंड मारून त्यात विजेचा प्रवाह खेळवण्यात आला आहे.
तब्बल ३५२ कॅमेरे अन् दोन टॉवर
कारागृहात एकापेक्षा एक कुख्यात गुन्हेगार आहेत. खुनातील संशयित आरोपी सर्वाधिक आहेत. त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी कारागृह पोलिसांबरोबर ३५२ कॅमेऱ्यांची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर रोखली आहे. दोन टॉवरवर सतत पोलिस पहारा असतो. तसेच कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह खेळवत ठेवलेला असतो.
फटाका फोडल्यानंतर मिळतो इशारा
अनेक आरोपींना गांजा, नशेच्या गोळ्या, दारू तसेच मटणाची चटक लागलेली असते. आतमध्ये हौस पुरवण्यासाठी बाहेरचे साथीदार रसद पुरवण्याचा प्रयत्न करतात. रबरी चेंडूतून गांजा टाकण्याचे प्रकार घडतात. मटणाची पाकिटे टाकण्याचा प्रकारही घडला होता. अलीकडे कारागृहापासून काही अंतरावर रात्री फटाके फोडले जातात. हा इशारा दिल्यानंतर आतमध्ये संबंधित आरोपीला गांजा मिळणार असे ठरलेले असते.
१३९ खुनातील संशयित आरोपी
जिल्हा कारागृहातील कैद्यांची क्षमता २३५ इतकी आहे. परंतु कारागृह सदैव तुडुंब भरलेले असते. सध्या ३२५ बंदी येथे आहेत. यापैकी १३९ बंदी खुनातील संशयित आरोपी आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बरेच संशयित कळंबा कारागृहात पाठवण्यात आले आहेत.
ब्रिटिशकालीन कारागृह
सांगलीतील वर्ग २ चे कारागृह ब्रिटिशकालीन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांना येथे डांबून ठेवले जात होते. याच कारागृहात वसंतदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पलायनाचे थरारनाट्य घडले होते. या वेळी गोळीबारात हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव हे दोन तरुण शहीद झाले होते.
कारागृहासाठी जागेचा शोध
सध्याच्या कारागृहाला नागरी वस्तीने वेढले आहे. शेजारीच शाळा आहे. महापूर आल्यानंतर कैद्यांना स्थलांतर करावे लागते. त्यामुळे शहराबाहेर नवीन कारागृहासाठी जागेचा शोध सुरू आहे. परंतु कारागृहाला काही गावांतून विरोध होतो. कारागृह गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असते. परंतु त्यामुळे गुन्हेगारी वाढते असा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
पळालेल्या ठिकाणी टॉवरचा प्रस्ताव
सध्या कारागृहाच्या पूर्वेकडील आग्नेय बाजूस म. के. आठवले शाळेसमोर संबंधित शिंदे कुटुंब आणि कारागृह यांच्यातील वादामुळे पडलेली तटबंदी बांधलेली नाही. तेथूनच आरोपी पळाला. आता या ठिकाणी टॉवर बांधण्याचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने तातडीने दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची पाहणी केली आहे.