लालपरीतून सहली निघाल्या, सांगली आगाराला फायदा झाला; तिजोरीत किती लाखांची पडली भर..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:35 IST2025-12-31T13:32:46+5:302025-12-31T13:35:57+5:30
३ महिन्यांत १३४ लालपरीतून घडवली विद्यार्थ्यांना आनंद यात्रा

संग्रहित छाया
प्रसाद माळी
सांगली : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शैक्षणिक सहली या केवळ सरकारी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेसने घेऊन जाणे बंधनकारक केले आहे. तसेच, परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नव्या कोऱ्या एसटी बस देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा चांगलाच फायदा सांगली आगाराला झाला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालवधीत गेलेल्या शैक्षणिक सहलीतून सांगली आगाराच्या तिजोरीत तब्बल २१ लाख ७१ हजार ८४० रुपयांची भर पडली आहे.
दिवाळीनंतर सर्व शाळांच्या शैक्षणिक सहलींना प्रारंभ होतो. गड, किल्ले, निसर्गरम्य समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे, संग्राहलये, विविध मंदिरे, विविध पर्यटन ठिकाणी शालेय सहली जातात. शिक्षण विभागाच्या नव्या नियमांमुळे आता एसटी महामंडळाची बसद्वारे सहली घेऊन जाणे शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सहलींसाठी शाळांशी होणाऱ्या प्रासंगिक कराराद्वारे एसटी महामंडळांकडून ५० टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने अनेक शाळांच्या सहली या लालपरीतून जात आहेत.
सहलीच्या माध्यमातून सांगली आगारास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत २१ लाख ७१ हजार ८४० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात २९ करार झाले होते. तर, तीन महिन्यांत १३४ बसद्वारे सहली गेल्या, तर ५२ हजार २५ किलोमीटर इतके एसटीची चाके फिरली. या सहलीचे नियोजन सागंली आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, शीतल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानक प्रमुख महेश पाटील, लिपिक अविनाश तुपे यांनी केले.
महिना / करार / बस/ किलोमीटर/ उत्पन्न
ऑक्टोबर / ८ / १६ / ५७५० / २,२२,४००
नोव्हेंबर / २१ / ४० / १५२६०/ ६,३७,४४०
डिसेंबर / -- / ७८ / ३१०१५/ १३१२०००
एकूण / -- / १३४/ ५२,०२५ / २१,७१,८४०
सांगलीतून सहली जाणारी प्रमुख ठिकाणे
१. मार्लेश्वर - गणपतीमुळे - रत्नागिरी
२. मालवण - सिंधुदुर्ग - कुणकेश्वर
३. वाई - महाबळेश्वर- प्रतापगड- महाड- रायगड
४. सातारा - सज्जनगड- ठोसेघर
४. पुरंदर - जेजुरी - मोरगाव (गणपती)- नारायणपूर (प्रतिबालाजी)
५. कोल्हापूर - पन्हाळा - जोतिबा - पावनखिंड
एसटी महामंडळाकडून शालेय सहलीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येते. सांगली आगारातून सहलीसाठी नव्या लालपरी देण्यात येत आहेत. शाळांनी एसटी बसमधून सहली घेऊन जाव्यात, यासाठी आम्ही शाळांना भेटी देत आहोत. - शीतल माने, आगार व्यवस्थापक, सांगली.