Sangli ZP Election Results 2026: कुंडलमध्ये काँग्रेसने काढला पराभवाचा वचपा, आमदार विश्वजित कदमांच्या भाच्याने अरुण लाड यांच्या सुनेचा केला पराभव
By अविनाश कोळी | Updated: February 9, 2026 13:23 IST2026-02-09T13:22:57+5:302026-02-09T13:23:38+5:30
आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा पराभूत

Sangli ZP Election Results 2026: कुंडलमध्ये काँग्रेसने काढला पराभवाचा वचपा, आमदार विश्वजित कदमांच्या भाच्याने अरुण लाड यांच्या सुनेचा केला पराभव
कुंडल : काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी आमदार अरुण लाड यांच्या स्नुषा धनश्री लाड यांचा पराभव करीत धक्कादायक निकालाची नोंद केली. मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडिल महेंद्र लाड यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काँग्रेसने काढल्याचे समर्थकांनी निकालानंतर जल्लोष केला.
कुंडल जिल्हा परिषद आणि बांबवडे पंचायत समिती गणांची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. येथे जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांचे पुत्र ऋषिकेश लाड हे तब्बल ५४१७ मतांनी निवडून आले आणि बांबवडे पंचायत समिती गणात सुवर्णा संकपाळ या १८९२ मतांनी निवडून आल्या. येथे काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.
गत निवडणुकीत शरद लाड आणि महेंद्र लाड यांच्यातील निवडणुकीत शरद लाड विजयी झाले होते. तेव्हापासूनची पराभवाची सल महेंद्र लाड यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये होती. आमदार डॉ विश्वजित कदम यांनी त्यांच्या दिवंगत भगिनी भारती यांच्या निधनानंतर भाचा ऋषिकेश लाड यांच्या या पहिल्याच निवडणुकीत सहभाग घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
या मतमोजणी दरम्यान घोगाव, कुंडल येथूनच ऋषिकेश यांना मताधिक्य येण्यास सुरुवात झाली होती. हे मताधिक्य अखेरपर्यंत अबाधितच राहिले. काँग्रेसचे ह्रषिकेश महेंद्र लाड यांना १६४४५ मते मिळाली तर धनश्री शरद लाड यांना ११०२८ मते मिळाली. पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या सुवर्णा पांडुरंग संकपाळ यांना ७८२७ तर भाजपच्या सुनंदा पोपट संकपाळ यांना ५९३५ मते मिळाली.
आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, घोगाव आणि सांडगेवाडी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर जल्लोष आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.