Sangli: बलगवडे सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात शेळ्या-मेंढ्यांसह ग्रामस्थांचा रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:17 IST2025-12-15T18:17:11+5:302025-12-15T18:17:35+5:30
शेतकऱ्यांचा संताप; आंदोलनामुळे तासगाव ते भिवघाट मार्गावरील वाहतूक ठप्प

संग्रहित छाया
मांजर्डे : बलगवडे (ता. तासगाव) येथे प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित आंदोलन छेडले आहे. रविवारी भिवघाट-तासगाव रोडवरील बलगवडे फाट्यावर शेळ्या-मेंढ्यांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
बलगवडे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रकल्पासाठी गट क्रमांक १८० व १८२ मधील गायरान जमिनीवर १५ हजारांहून अधिक झाडांची तोड सुरू आहे. यामुळे गंभीर पर्यावरणीय नुकसान होणार आहे. ही झाडे बिहार पॅटर्न अंतर्गत मोहीम राबवून १० लाख खर्च करून लावण्यात आली होती. त्यामुळे या सोलर प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
चुकीच्या पंचनाम्यांच्या आधारे प्रकल्पास मंजुरी देण्यात आल्याचा तसेच ग्रामसभेचे ठराव डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांची न्यायालयात जाण्याची तयारी
ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रकल्प कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी ग्रामस्थांची वादावादी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ग्रामस्थांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असून, सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णतः रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
९ डिसेंबरपासून विविध आंदोलने
सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची सुरुवात ९ डिसेंबर रोजी उपोषणाने झाली. १२ डिसेंबरला गाव बंद आंदोलन करण्यात आले. १४ राेजी रास्ता रोको करून संताप व्यक्त करण्यात आला. १५ डिसेंबरपासून कार्य बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभा व महिला आघाडीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.