Sangli Murder: सांगलीतील थरारक घटना, किरकोळ वादातून गुंडाचा पाठलाग करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:59 IST2025-05-12T21:57:47+5:302025-05-12T21:59:53+5:30

Sangli Crime: सांगलीत सहा जणांनी एका गुंडाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून त्याचा निर्घृण खून केला,

Sangli Murder: Thrilling incident in Sangli, goon chased and killed over minor dispute | Sangli Murder: सांगलीतील थरारक घटना, किरकोळ वादातून गुंडाचा पाठलाग करून हत्या

Sangli Murder: सांगलीतील थरारक घटना, किरकोळ वादातून गुंडाचा पाठलाग करून हत्या

घनशाम नवाथे, लोकमत न्यूज नेटवर्क: आर्म ॲक्टसारखे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार मुबारक असिउल्ला शाह (वय ४२, रा. प्रकाशनगर, अहिल्यानगर) याचा सहा जणांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केला. मंगळवार बाजार चौक ते नुमराह मशीदसमोर हे थरारनाट्य घडले. हल्ल्यानंतर सहा जण दोन दुचाकींवरून पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झाला आहे. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत मुबारक शाह याचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. बऱ्याच वर्षांपासून ते सांगलीत राहतात. मुबारक हा प्रकाशनगर येथे पत्नीसह राहत होता. त्याला एक मुलगी आहे. मुबारक पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुनी हल्ला, आर्म ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलीकडे तो ‘स्क्रॅप’चा व्यवसाय करीत होता. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्रीनगर येथील हॉटेल रत्नामध्ये मित्र अझरुद्दीन इनामदार याच्याबरोबर आला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास मंगळवार बाजाराच्या कोपऱ्यावर रिक्षा थांब्याजवळ पानटपरीवर मावा खाण्यासाठी दोघे आले. दोघे जण बाकड्यावर बसले होते. त्यावेळी संशयित त्या ठिकाणी आले. मुबारक आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून एकाने धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. त्यामुळे जिवाच्या आकांताने आरडाओरडा करत मुबारक तेथून पश्चिमेला रेल्वे स्टेशनच्या बाजूला पळत सुटला. मात्र, नुमराह मशीदसमोर रस्त्याच्या पलीकडे गल्लीच्या कोपऱ्यावर संशयितांनी दुचाकीवरून त्याला गाठले. तेथे त्याला दगडाने ठेचले. दगडाचा घाव वर्मी बसल्याने मुबारक जागीच निपचित पडला. हे थरारनाट्य काहींनी बघितले.

दरम्यान, संशयितांनी तत्काळ दुचाकीवरून पलायन केले. नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेस बोलावले. परंतु, मुबारकचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस घटनास्थळी आले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही आले. हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे अन्वेषणसह संजयनगर पोलिसांची पथके रवाना झाली.

सीसीटीव्हीचे फूटेज हाती
मुबारक पळत गेल्यानंतर त्याला ज्या गल्लीच्या तोंडाशी गाठण्यात आले, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्ल्याचा प्रकार चित्रित झाला आहे. त्यामुळे दोन दुचाकींवरून सहा जण आल्याचे दिसून येते. पोलिसांनी कॅमेऱ्यातील फूटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

किरकोळ वाद की टोळीयुद्ध?
मृत मुबारक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो एका टोळीशी संबंधित होता. त्यामुळे त्याला किरकोळ वादातून की टोळीयुद्धातून मारले, याचा पोलिस तपास करीत आहेत. हल्लेखोरांना ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

मावा खाण्यास आल्यानंतर हल्ला
मंगळवार बाजाराजवळील छावा चौकात मुबारक शाह आणि त्याचा मित्र अझरुद्दीन हे दोघे जण मावा खाण्यास आले होते. तेव्हा पाठलागावर असलेले सहा हल्लेखोर तेथे आले. वादानंतर धारदार शस्त्राने मुबारकवर वार करताच तो पळाला. परंतु, हल्लेखोरांनी नुमराह मशीदसमोर रस्त्याच्या पलीकडे कॉलनीत त्याला गाठून हल्ला चढवला.

घटनास्थळी पोलिस फौजफाटा
खुनाची माहिती मिळताच संजयनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण स्वामी यांनी पथकासह धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि पथकही तत्काळ दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. घटनास्थळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.

Web Title: Sangli Murder: Thrilling incident in Sangli, goon chased and killed over minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.