सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूने छातीत वार, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 05:20 IST2026-01-28T05:19:55+5:302026-01-28T05:20:17+5:30
Sangli Crime News: गली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.

सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, चाकूने छातीत वार, प्रकृती चिंताजनक
सांगली - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना आज मंगळवार दि. २७ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली. हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्रांनी टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील माळी हे कुटुंबीयांसह कलानगर येथे राहतात. आज सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी चाकूने पोटात उजव्या बाजूला वार केले. वार इतका वर्मी होता की चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. माळी यांच्या मित्रांनी तातडीने टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी अति दक्षता विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तीन महिन्यापूर्वी हल्ला
सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.