ठेकेदारांत स्पर्धा झाली अन् सांगली महापालिकेचे तीन कोटी वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:23 IST2025-09-03T19:22:17+5:302025-09-03T19:23:56+5:30
महापालिकेच्या स्थायी सभेत मंजुरी : १४ कोटींच्या विविध कामांसाठी २० ते ४० टक्के कमी दराने निविदा

ठेकेदारांत स्पर्धा झाली अन् सांगली महापालिकेचे तीन कोटी वाचले
सांगली : महापालिका क्षेत्रातील विविध कामांच्या निविदांबाबत सातत्याने मॅनेजचा आरोप होत असतो. मात्र, नुकतीच १४ कोटींच्या कामांसाठी मागवलेल्या निविदा २० ते ४० टक्के कमी दरांनी आल्याने महापालिकेला दोन ते अडीच कोटी रुपये बचत झाली. या निविदांना स्थायी समितीच्या सभेत सोमवारी मंजुरी देण्यात आली.
महापालिकेत सोमवारी प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी होते. तसेच अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, निखिल जाधव, स्मृती पाटील यांसह खातेप्रमुख उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि विविध साहित्य खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदांसाठी ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली.
पहिल्यांदाच मोठ्या संख्येने ठेकेदारांनी भाग घेतला, परिणामी या १४ कोटींच्या निविदा २० ते ४० टक्के कमी दराने आल्या. याच निविदांच्या दरमान्यतेसंबंधी विषय सभेसमोर उभे होते आणि त्याला मंजुरी देण्यात आली. यामध्ये कर्मवीर चौक ते प्रबोधनकार ठाकरे चौकापर्यंत पेव्हिंग ब्लॉक फूटपाथ करणे, पोरेज टीव्हीएस शोरूम ते शासकीय विश्रामगृहापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पेव्हिंग ब्लॉक रस्ता व फूटपाथ करण्याच्या कामांचा समावेश होता.
सभेत मानधन कर्मचाऱ्यांसाठी मुदतवाढ, तसेच नवीन दहा ट्रॉलीमाऊंटेड दहा सिटर टॉयलेट युनिट खरेदी करण्यास देखील मान्यता देण्यात आली. याशिवाय महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये सोलर ऑपरेटेड आयओटी स्किल डेव्हलपमेंट लॅब विकसित करण्यासाठी २.५० कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता प्रदान करण्यात आली.