Sangli flood: कृष्णेच्या पुरावर १२ कॅमेऱ्यांतून महापालिकेची नजर, वॉररुम २४ तास सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 18:58 IST2025-08-22T18:58:08+5:302025-08-22T18:58:24+5:30

पूरबाधित नागरिकांना मदतीचा हात

Sangli Municipal Corporation keeps an eye on Krishna flood through 12 cameras, warroom on alert 24 hours | Sangli flood: कृष्णेच्या पुरावर १२ कॅमेऱ्यांतून महापालिकेची नजर, वॉररुम २४ तास सतर्क 

छाया-नंदकिशोर वाघमारे

सांगली : कृष्णा नदीचा वाढता धोका आणि कोयना-वारणाच्या विसर्गामुळे शहराला पुन्हा एकदा पुराचा फटका बसला. अशा परिस्थितीत महापालिकेची वाॅररूम पूर्ण क्षमतेने सज्ज होती. चोवीस तास कृष्णा नदीच्या पातळीवर १२ कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात आली. त्यामुळे दर तासाला नदीपात्राची पातळी किती वाढली, हे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. वेळीच नागरिकांचे स्थलांतर करण्यात वाॅररूमला मोठा वाटा ठरला आहे.

महापालिकेच्या मंगलधाम इमारतीत पाच वर्षांपूर्वी सिटी कमांड सेंटर सुरू करण्यात आले. २०१९ च्या महापुरानंतर पालिकेने नदीपात्रातील पाण्याच्या पातळीवर वाॅच ठेवण्यासाठी आयर्विन पूल, मिरज कृष्णा घाटावर सीसीटीव्ही बसविले. त्यानंतर पूरबाधित क्षेत्रासाठी प्राईड मल्टिप्लेक्ससह ११ ठिकाणी उच्च दर्जाचे कॅमेरे बसविण्यात आले. यातील दोन कॅमेरे पीडीझेड दर्जाचे असून त्यातून पूरबाधित ३ ते ४ किलोमीटरवर लक्ष ठेवता येते. सीसीटीव्हीद्वारे सतत डेटा संकलन करून थेट लक्ष ठेवण्यात येत आहे. सीसीटीव्हीद्वारे सतत डेटा संकलन करून थेट लक्ष ठेवण्यात येतंय.

वाॅररूममध्ये १२ सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल स्क्रीन, वायरलेस संदेशवहन व्यवस्था, इंटरनेट सुविधा आणि आपत्ती मित्र ॲप यांसारखी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीसाठी २४ तास टोल-फ्री क्रमांक कार्यरत आहे. आयर्विन पूल, सांगली व कृष्णाघाट-मिरज पूल येथे पाणी किती वाढले, याचा अंदाज नागरिकांना प्रत्येक तासाला आपत्ती मित्र ॲपवर मिळत आहे. आपत्ती कक्षाचे प्रमुख सहायक आयुक्त नकुल जकाते, प्रभारी अधीक्षक प्रमोद रजपूत, लिपिक बंदेनवाज पिरजादे, अनिता जाधव यांच्यासह ११ कर्मचारी चोवीस तास पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

कुठे आहेत कॅमेरे?

आयर्विन पूल, अमरधाम स्मशानभूमी, दत्तनगर जॅकवेल, सांगलीवाडी, सूर्यवंशी प्लाॅट, बाळूमामा मंदिर कर्नाळ रोड, न्यू प्राईड मल्टिप्लेक्स, अग्निशमन कार्यालय स्टेशन चौक, टिंबर एरिया अग्निशमन कार्यालय, दत्त प्लाॅट कर्नाळ रोड, मिरज कृष्णा घाट, काळीवाट साईमंदिर

पाच वर्षांपासून कक्ष कार्यरत

२०१९ मध्ये सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसला. कृष्णा नदीची पाणीपातळी ५७ फुटांवर गेली. लाखो लोक घरात अडकून पडले होते. त्यानंतर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन केंद्रांतर्गत सिटी कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. कर्मवीर चौकातील मंगलधाम कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर ३ हजार चौरस फूट जागेत अद्ययावत सुविधा असलेले वाॅररूम २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले.

दिवसभरात १०० काॅल

वाॅररूमशी संपर्क साधण्यासाठी तीन फोन नंबर दिले आहेत. पुराच्या काळात गेल्या तीन दिवसांपासून दररोज १०० हून अधिक नागरिक वाॅररूमशी संपर्क साधून पुराच्या स्थितीची माहिती घेत आहेत. केवळ पुराच्या काळातच नव्हे तर इतरवेळीही काॅलसेंटरला नागरिक संपर्क करतात. कुठे झाड पडले, रस्ता घसरगुंड झाला, वीज पडली, अपघात झाला तरीही नागरिक वाॅररूमशी संपर्क करीत असल्याचे सहायक आयुक्त जकाते यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्रात कॅमेरे बसविले आहेत. वाॅकीटाॅकीची व्यवस्था केली आहे. कमांड सेंटरमधून पुराच्या पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना संपर्कासाठी तीन फोन नंबरही दिले आहेत. पुराची पातळी वाढल्यास संबंधित भागातील पालिका कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. - सत्यम गांधी, आयुक्त, महापालिका

Web Title: Sangli Municipal Corporation keeps an eye on Krishna flood through 12 cameras, warroom on alert 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.