सांगली-अमेरिकेमधील टपालसेवा बंद झाल्याने मोठा आर्थिक फटका; पाठवल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या, दर काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:10 IST2025-09-05T16:10:20+5:302025-09-05T16:10:33+5:30

वेगवेगळ्या सण-वारानिमित्त पार्सलच्या माध्यमातून भेट वस्तू, पदार्थ, कापड, कागदपत्रे पाठवतात

Sangli Major economic impact due to closure of postal services in America | सांगली-अमेरिकेमधील टपालसेवा बंद झाल्याने मोठा आर्थिक फटका; पाठवल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या, दर काय.. वाचा

सांगली-अमेरिकेमधील टपालसेवा बंद झाल्याने मोठा आर्थिक फटका; पाठवल्या जाणाऱ्या वस्तू कोणत्या, दर काय.. वाचा

प्रसाद माळी

सांगली : अमेरिका व भारतादरम्यानची टपाल सेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. अमेरिकेच्या सीमा शुल्क विभागाने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे निर्माण झालेल्या गोंधळात ही सेवा तात्पुरती थांबविण्याचा निर्णय भारतीय टपाल विभागाने घेतला आहे. सांगलीतून अमेरिकेत मागील वर्षी पार्सल व लेटरच्या माध्यमातून ४२ लाख ९४ हजार ९२९ इतके उत्पन्न सांगली विभागाला मिळाले होते. अमेरिकेला होणारी टपाल सेवा बंदमुळे सांगली विभागाला मोठा फटका बसणार आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक जण अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांना इथले कुटुंबीय, नातेवाईक वेगवेगळ्या सण-वारानिमित्त पार्सलच्या माध्यमातून भेट वस्तू, पदार्थ, कापड, कागदपत्रे पाठवतात. दिवाळीमध्ये फळाराचे पदार्थ व राखी पौर्णिमेला राखी पाठवली जाते. अमेरिकेतील लोकही येथून तेथे न मिळणाऱ्या वस्तू मागवतात; पण अमेरिका व भारतादरम्यान होणारी टपाल सेवा बंद झाल्याने अमेरिकेत वस्तू कशा पाठवायच्या, याची चिंता सांगलीकरांना लागली आहे.

सांगली टपाल विभागातील विविध टपाल कार्यालयाकडून २०२४-२५ काळात ५०२ पार्सल पाठविण्यात आले. त्या माध्यमातून ३२ लाख ५९ हजार ८९२ इतके उत्पन्न मिळाले, तर १८८ कागदपत्रे पाठविण्यात आली. त्याद्वारे १० लाख ३६ हजार २५ रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २०२४ च्या दिवाळीमध्ये अमेरिकेला पाठविण्यात आलेल्या भेटवस्तू व फळाराच्या माध्यमातून तीन लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले होते. काही दिवसांतच दिवाळी येणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये तोडगा निघाला नाही तर नागरिकांना त्यांच्या नातेवाइकांना कोणत्या वस्तू तर पाठवता येणार नाहीत. शिवाय टपाल विभागाला लाखोंचा फटका बसणार आहे.

अमेरिकेत पार्सलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या वस्तू

दिवाळीचे फराळ, मसाल्याचे पदार्थ, ड्राय फ्रूट, पारंपरिक भारतीय कपडे, साड्या तसेच तिकडे न मिळणाऱ्या वस्तू.

पाठवली जाणारी कागदपत्रे

शैक्षणिक डिग्री, प्रमाणपत्रे, टॅक्सची कागदपत्रे, महत्त्वाच्या फाइल्स, जन्माचे दाखले व अन्य महत्त्वाची कागदपत्रे.

विदेशात पोस्टाने फराळ पाठविण्याचे दर

देश / ५ किलो / १० किलाे / १५ किलो
अमेरिका / ५,५१०/ ९,०५०/ १२,५९०
यू.ए.ई/ २,५४८/ ३,४९२/ ४,४३६
कॅनडा/५,४२८/९,६७६/१३,९२४
रशिया/ ३,९१८/ ६,७५०/९,५८२
यू.के./ ४,३३७/ ६,४६१/ ८,५८५

विदेशात लेटर, कागदपत्रे पोस्टाने पाठविण्याचा ५० ग्रॅमचा दर
अमेरिका / ४७२
जर्मनी / २८९
यू.के / २३६
यू.ए.ई / २१९
ऑस्ट्रेलिया / ४३७
कॅनडा / ४२५

सद्य:स्थितीला अमेरिका-भारत टपाल सेवा थांबली आहे. वरिष्ठ पातळीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच यामध्ये सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा आहे. तूर्तास आमच्या ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.- बसवराज वालिकर, प्रवर अधीक्षक, टपाल विभाग, सांगली.

Web Title: Sangli Major economic impact due to closure of postal services in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.