सांगलीचे इंटरनेट स्पीड मुंबई, पुणे, बंगळुरू अन् हैदराबाद सारखाच; व्यावसायिकांची आयटीमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 18:36 IST2024-12-31T18:36:01+5:302024-12-31T18:36:25+5:30

संतोष भिसे सांगली : काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगलीची इंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होती; पण खासगी नेट कंपन्यांमुळे येथील इंटरनेट सेवेला स्पीड ...

Sangli internet speed is similar to Mumbai, Pune, Bangalore and Hyderabad Businesses invest crores in IT | सांगलीचे इंटरनेट स्पीड मुंबई, पुणे, बंगळुरू अन् हैदराबाद सारखाच; व्यावसायिकांची आयटीमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक

सांगलीचे इंटरनेट स्पीड मुंबई, पुणे, बंगळुरू अन् हैदराबाद सारखाच; व्यावसायिकांची आयटीमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक

संतोष भिसे

सांगली : काही वर्षांपूर्वीपर्यंत सांगलीचीइंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होती; पण खासगी नेट कंपन्यांमुळे येथील इंटरनेट सेवेला स्पीड मिळाले आहे. मुंबई-पुण्याइतकेच स्पीड आता सांगलीतही मिळते. आयटी कंपनी सुरू करण्यासाठीची अत्यंत मूलभूत गरज पूर्ण झाल्याने येथे कंपन्या सुरू होऊ शकतात. त्यासाठी प्रशासकीय आणि शासकीय स्तरावर थोड्याफार बूस्टची गरज आहे.

सांगलीत आयटी पार्कसाठी पुरेशा सवलतीने जमीन उपलब्ध व्हायला हवी. विविध करांमध्ये सवलती मिळायला हव्यात. अखंडित वीजपुरवठादेखील आवश्यक आहे. सरकारी परवानग्यांमधील लाल फितीचा अडसर लोकप्रतिनिधींनी दूर करायला हवा. इतक्या सोयी-सुविधा मिळाल्यास आयटी कंपन्यांचे प्रवर्तक सांगलीकडे वळतील हे निश्चित. चांगल्या कंपन्या आल्यास पुणे-मुंबई किंवा अन्य शहरांकडे धाव घेणारे पदवीधर येथेच थांबतील. सध्या प्रत्येक शुक्रवारी रात्री पुण्याहून सांगलीकडे धाव घेणारे आणि शनिवार-रविवारची सुटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे परत पुण्याकडे धाव घेणारे शेकडो आयटीयन्स पुणे-बंगळुरू महामार्गावर दिसतात.

पुण्यातील आयटी कंंपनीत नोकरी म्हणजे चैनी असा समज असलेले सांगलीकर त्यांच्या हालअपेष्टांपासून अनभिज्ञ आहेत. सांगलीत पार्क सुरू झाल्यास हेच तरुण तुलनेने कमी पॅकेजमध्ये येथेच थांबतील. पॅकेज कमी मिळाले, तरी कुटुंबासोबत राहता येईल हा त्यांच्यासाठी लाखमोलाचा फायदा ठरतो. यातील अनेकजण आजही तीन दिवस वर्क फ्रॉम होम, तर तीन दिवस वर्क इन ऑफिस असे काम करत आहेत. काही तरुण तर वर्ष-वर्षभर वर्क फ्रॉम होम करत आहेत. हा विचार करता आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांची छोटी कार्यालये सांगलीतील पार्कमध्ये सुरू होऊ शकतात.

सांगली जिल्ह्यातील अनेक उद्योगांनी आयटीविषयक आपल्या गरजा भागविण्यासाठी स्वत:चे आयटी सेल सुरू केले आहेत. प्रसिद्ध चितळे उद्योग समूह, गाडगीळ सराफ पेढी, काही बँका यांचे स्वत:चे आयटी विभाग कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठी गुंतवणूकही केली आहे. सांगलीत आयटी पार्क सुरू झाल्यास असे मोठे उद्योग तेथून सेवा घेतील. त्यांना स्वत:चे पैसे मोठ्या प्रमाणात गुंतवून ठेवावे लागणार नाहीत.

सांगलीची बलस्थाने कोणती?

  • चांगले हवामान आणि वैद्यकीय सेवा
  • रेल्वे आणि महामार्गांची उपलब्धता
  • मोठ्या संख्येने पदवीधर तरुणांची उपलब्धता
  • पुणे-मुंबईच्या तुलनेत अत्यंत स्वस्त राहणीमान
  • पुणे-मुंबईच्या तुलनेत जागांचे भाव ७० टक्क्यांपर्यंत कमी
  • स्वस्त मनुष्यबळ, वाहतूक कोंडीची समस्या नाही
  • सांगलीचे जीवनमान तुलनेने ताणतणावमुक्त


सांगलीचे कच्चे दुवे कोणते?

  • विमानतळासाठी कोल्हापूर किंवा बेळगाववर अवलंबून
  • सांगलीच्या बलस्थानांच्या मार्केटिंगचा अभाव
  • सांगलीच्या लोकप्रतिनिधींमध्ये आयटी पार्कबाबत अनास्था
  • सांगली व्हिजनमध्ये आयटी पार्कविषयी फक्त चर्चाच

Web Title: Sangli internet speed is similar to Mumbai, Pune, Bangalore and Hyderabad Businesses invest crores in IT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.