Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम
By अविनाश कोळी | Updated: December 25, 2024 15:13 IST2024-12-25T15:11:22+5:302024-12-25T15:13:25+5:30
सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न ...

Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम
सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबांना सतावतो. कुपवाड रोडवरील गरिब वस्तीतील मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतलेल्या डॉ. नितीन नायक यांनी या मुलांच्या शाळेतील सहलीची फी भरण्यासाठी शक्कल लढविली. परसबागेत पिकलेली सेंद्रीय फळे त्यांनी विक्रीस काढली. त्यातून जमलेल्या पैशातून त्यांनी मुलांच्या सहलीचे पैसे भरले.
कुपवाड ते बुधगाव रस्त्यावर वसलेल्या बाळकृष्ण नगर कापसे प्लॉटमधील तब्बल ४० मुलांची शिक्षणाची जबाबदारी भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. नितीन नायक यांनी घेतली आहे. परिसरात हातावरचे पोट असलेली लोकवस्ती अधिक आहे. घरातले पुरुष व महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते.
मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉ. नायक यांच्या लक्षात आली. त्यांनी आता त्यांना शिक्षणाच्या वाटेवरुन चालण्यास शिकविले. त्यांची फी भरणे, त्यांना शाळेत सोडणे, प्रसंगी अभ्यासात मदत करणे अशा सर्व गोष्टी ते करीत असतात. सध्या शाळांच्या स्नेहसंमेलनांचा व सहलींचा हंगाम आहे. याच वस्तीतल्या १२ मुलांना सहलीसाठी पैसे भरता येत नव्हते.
नायक यांनी त्यांच्या बागेतील पपई, केळी, रामफळ काढून क्रेट भरुन घेतले. रिक्षातून त्यांनी बापट उद्यान गाठले. ‘सेंद्रीय फळे विक्रीस’ असा फलक झळकविला. नायक यांना ओळखणारे अनेकजण असल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. हा शैक्षणिक उपक्रम आहे म्हटल्यावर सर्वांनी ही फळे घेतली. अर्ध्या तासात सर्व क्रेट रिकामे झाले. चार हजार रुपये त्यांना मिळाले.
शाळेत जाऊन फी भरली
पैसे मिळाल्यानंतर नायक यांनी थेट मुलांची शाळा गाठली. त्यांनी बारा मुलांच्या सहलीचे पैसे भरले. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. नायक यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.