आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:55 IST2026-02-06T15:55:29+5:302026-02-06T15:55:45+5:30
आटपाडी तालुका कोल्हापूर विभागात अव्वल, जत आणि वाळवा तालुकेही गुणवत्तापूर्ण कामगिरीत टॉपर

आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम
सांगली : आरोग्य संसाधन यंत्रणेमार्फत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांच्या मानांकनात सांगली जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कोल्हापूर विभागात जिल्हा अग्रक्रमावर आहे.
या सरकारी आरोग्य संस्थांंमध्ये विविध आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. त्याचे निर्देशांक प्रत्येक महिन्याला जाहीर केले जातात. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या मानांकनात सांगलीने जोरदार यश मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर कोल्हापूर विभागीय परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत आरोग्यसेवेतील सांगलीची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आटपाडी तालुक्याने तालुका आरोग्य अधिकारी मानांकनात कोल्हापूर परिमंडळ विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर जत, तासगाव व वाळवा तालुक्यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे.
माता बालसंगोपन, आरोग्य व कुटुंब कल्याण, किशोरवयीन मुली, आरसीएच पोर्टल, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम, आरोग्य अभियान, एकात्मिक साथरोग सर्वेक्षण, प्रशासकीय कामकाज आदी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सांगली जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच ही आघाडी घेता आल्याचे ते म्हणाले.
सामूहिक कामगिरीची फलश्रुती
जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाभरात आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून गावपातळवरील आशा कार्यकर्तीपर्यंतच्या प्रत्येक घटकाने आरोग्यसेवेत सहभाग दिला. या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यपातळीवरील यशाला गवसणी घालता आली.
उत्तम प्राथमिक उपचारांसह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून यापुढेही कायम राहणार आहे. आटपाडी, वाळवा, जत तालुक्यांच्या कामगिरीनेही जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्याा गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. भविष्यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख आरोग्यसेवा देण्याचा संकल्प आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी