...तर सांगली जिल्हा बँकेची कृषी कर्ज थकबाकी तीन हजार कोटींवर जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:58 IST2025-11-14T18:58:49+5:302025-11-14T18:58:49+5:30
बँक प्रशासनाचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष : पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे ठप्प

...तर सांगली जिल्हा बँकेची कृषी कर्ज थकबाकी तीन हजार कोटींवर जाणार
सांगली : शासनाने मार्च २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे सध्या पीक कर्जाची थकबाकी भरणा पूर्णपणे थांबली आहे. बँकेची जून २०२५ अखेरची शेती कर्जाची सुमारे ७२९ कोटी इतकी थकबाकी आहे. जर शासनाने कर्जमाफी दिली नाही, तर जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे तीन हजार कोटींवर जाणार असून, बँकेचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडणार आहे.
माजी आमदार बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या आंदोलनानंतर शासनाने शेती कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यासाठी एक उच्च समिती नियुक्त केली असून, ही समिती एप्रिलमध्ये शासनाला अहवाल देणार आहे. या अहवालानंतर शासन ३० जूनअखेर कर्जमाफी देणार आहे. या आश्वासनावर कर्जमाफीचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, कर्जमाफी किती, कोणाला, कोणते निकष, सरसकट देणार की यामध्ये पुन्हा मागील प्रमाणे, नियमित भरणाऱ्यांना काय दिले जाईल, हे काहीही स्पष्ट झाले नसल्याने कर्जमाफीबाबत सध्यातरी संभ्रम निर्माण झाला आहे.
असे असले तरी शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांनी कर्जे भरणे थांबविले असून, शेती कर्जाची वसुली पूर्णपणे थांबली आहे. शासनाच्या घोषणेचा सर्वाधिक फटका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बसणार आहे. जिल्हा बँकेने मार्च २०२५ अखेर सुमारे २४०० कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेती कर्जाचा एक रुपया वसूल होणार नसल्यामुळे बँकेला आर्थिक फटका बसणार आहे.
सध्या मार्च २०२५ अखेरची सुमारे ५५७ कोटी इतकी जुनी थकबाकी असून, यामध्ये जूनअखेर वाढ होऊन ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे. ३० जून २०२६ अखेरपर्यंत शासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी दिली नाहीतर मात्र थकीत ७२९ कोटी आणि चालू २४०० कोटी अशी सुमारे जिल्हा बँकेची थकबाकी तीन हजार कोटींवर जाईल. असे झाल्यास जिल्हा बँकेचे आर्थिक गणितच बिघडणार आहे.
जून २०२५ अखेरची जुनी थकबाकी : ७२९ कोटी
जिल्हा बँकेने दिलेल्या शेतीकर्जापैकी मार्च २०२५ अखेर सुमारे ५५७ कोटी ९२ लाख इतकी थकबाकी असून, ५१,२६४ सभासदांचा समावेश आहे. थकबाकीत सर्वाधिक थकबाकी जत तालुक्याची असून, १४३ कोटी इतकी थकबाकी आहे. तासगावमध्ये १०४ कोटी, बाळबा ३१ कोटी ७० लाख, शिराळा ९ कोटी १८ लाख, मिरज ९९ कोटी ८२ लाख, खानापूर २२ कोटी १९ लाख, आटपाडी ३२ कोटी ३४ लाख, पलूस ३८ कोटी १० लाख, कडेगाव १४ कोटी ६५ लाख, कवठेमहकाळ ६६ कोटी इतकी थकबाकी आहे, तर ३० जूनअखेर थकबाकीत वाढ झाली असून, ती ७२९ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे.
३० जून २०२५ अखेरची तालुकानिहाय थकबाकी
- तासगाव : १६९ कोटी ७८ लाख
- जत : १६२ कोटी ६२ लाख
- मिरज : ११८ कोटी ३७ लाख
- कवठेमहकाळ : ७० कोटी ९३ लाख
- पलूस : ५४ कोटी ७० लाख
- नवलवा : ४९ कोटी ९ लाख
- आटपाडी : ३६ कोटी ६६ लाख
- कडेगाव : २६ कोटी ८५ लाख
- खानापूर : २५ कोटी ८२ लाख
- शिराळा : १४ कोटी ७२ लाख