इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना मिरची पूड टाकून लुटले, सव्वा लाखाची रक्कम लांबविली

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 20:17 IST2024-12-20T20:16:31+5:302024-12-20T20:17:33+5:30

Sangli Crime News: कर्जाचे हप्ते वसूल करून निघालेल्या इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख १५ हजार रुपये लुटणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. यातील अन्य चौघेजण पसार झाले आहेत.

Sangli Crime News: Indi Credit Union employees robbed by throwing chilli powder, Rs 1.25 lakhs stolen | इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना मिरची पूड टाकून लुटले, सव्वा लाखाची रक्कम लांबविली

इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना मिरची पूड टाकून लुटले, सव्वा लाखाची रक्कम लांबविली

- अशोक डोंबाळे 
सांगली -  कर्जाचे हप्ते वसूल करून निघालेल्या इंडी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख १५ हजार रुपये लुटणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. यातील अन्य चौघेजण पसार झाले आहेत. सचिन परशुराम कांबळे (वय २४, रा. लवंगा, ता. जत) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोत्याव बोबलाद येथे कारवाई केली.

सुनील तानाजी लोखंडे, सचिन महादेव बिराजदार-पाटील, परशुराम कांतू कांबळे आणि हंजाप्पा मांग (सर्व रा. लवंगा) अशी पसार झालेल्यांची नावे असून, त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेमध्ये फिर्यादी श्रीधर सुब्बाराय बगली हे कर्जाचे हप्ते वसूल करण्याचे काम करतात, तर पालकशी मनोहर व्यंकटची हे मॅनेजर म्हणून काम करतात. श्रीधर बगली आणि त्यांचे मॅनेजर व्यंकटची हे दोघेजण बुधवार, दि. ४ डिसेंबर रोजी जत तालुक्यातील गिरगावमधील लोकांकडून कर्जाचे हप्ते वसुलीसाठी आले होते. दिवसभरात एक लाख १५ हजार रुपये वसूल करून सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोघे निघाले होते. यावेळी संशयितांनी दोघांना वाटेत अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूचा धाक दाखवत दोघांकडे पैशांची बॅग घेऊन पळून गेले होते. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करताना पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली की, लवंगा गावातील सचिन कांबळे, सचिन बिराजदार-पाटील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला आहे. त्यातील कांबळे हा कोत्याव बोबलाद चौकात आला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा टाकून त्यास जेरबंद केले. गुन्ह्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी उमदी पोलिसाच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, संदीप कांबळे, संदीप गुरव, नागेश खरात, सतीश माने, दरिबा बंडगर, अमर नरळे, विक्रम खोत यांच्या पथकाने केली.

Web Title: Sangli Crime News: Indi Credit Union employees robbed by throwing chilli powder, Rs 1.25 lakhs stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.