सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन
By अविनाश कोळी | Updated: June 12, 2023 19:31 IST2023-06-12T19:30:20+5:302023-06-12T19:31:15+5:30
कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला

सांगली शहरावर पाणीटंचाईचे सावट, काटकसरीने पाणी वापराचे महापालिकेचे आवाहन
सांगली : कोयना धरणातून नदीकाठच्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी होणारा विसर्ग कमी केल्यामुळे नदीपातळीत घट होत आहे. त्यामुळे सांगली शहरावर सध्या पाणीटंचाईचे सावट आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. सांगली शहराचा पाणीपुरवठा आता पावसाच्या भरवशावर राहिला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे २ हजार क्युसेकवरून विसर्ग १०५० वर आला आहे. यामुळे नदीपातळीत घट होताना दिसत आहे. महापालिकेच्या जॅकवेलजवळ पुरेशा प्रमाणात सध्या पाणीपातळी असली तरी ती किती दिवस टिकेल याचा अंदाज कोणालाही नाही. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सांगली शहरावर दिसत आहे. याबाबत दक्षता घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
सांगली, कुपवाड शहरासाठी महापालिका दररोज ८० दशलक्ष तर मिरजेसाठी ३० दशलक्ष लिटर पाणी उचलते. सध्या पूर्ण क्षमतेने पाणी उचलले जात असले तरी उपसा केंद्राजवळ पाणी घटत आहे. जोपर्यंत पावसाचे आगमन होत नाही, तोपर्यंत अशीच परिस्थिती राहणार आहे. पावसाळा लांबला तर पाणीटंचाईचा सामना सांगलीतील नागरिकांना करावा लागतो. हरीपुरात वारणा नदीच्या संगमामुळे मिरजेला सध्या पुरेसा पाणीसाठा दिसून येत असला तरी वारणा धरणातील साठाही कमी झाला आहे.