तस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 12:42 PM2021-06-14T12:42:08+5:302021-06-14T12:43:42+5:30

Crimenews Sangli : देशभरातील सोने तस्करीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. केरळमध्ये वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या तपासादरम्यान, किमान १०० किलो सोने आजवर सांगलीला पाठवल्याचे तपास संस्थांना आढळले आहे. दरम्यान, तपास संस्थांचे अधिकारी सांगलीत मुक्काम ठोकून आहेत.

Sangli becomes a center for making jewelery from smuggled gold | तस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्र

तस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्र

googlenewsNext
ठळक मुद्देतस्करीच्या सोन्यातून दागिने घडवणारे सांगली बनतेय केंद्रतपास संस्थांचा सांगलीत मुक्काम

संतोष भिसे 

सांगली : देशभरातील सोने तस्करीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे सांगलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. केरळमध्ये वर्षभरापूर्वी उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या तपासादरम्यान, किमान १०० किलो सोने आजवर सांगलीला पाठवल्याचे तपास संस्थांना आढळले आहे. दरम्यान, तपास संस्थांचे अधिकारी सांगलीत मुक्काम ठोकून आहेत.

सांगलीतील शेकडो गलई व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विखुरले आहेत, त्यापैकी काहीजण सोने तस्करीशी संबंधित असल्याचे वेळोवेळी आढळले आहे. तीनच आठवड्यांपूर्वी कर्नाटकात हरियुरजवळ नऊ कोटींच्या सोन्याच्या तस्करी उघडकीस आली होती. वडगाव व कवलापुरच्या दोघा तरुणांना महसुल व गुप्तचर संचालनालयाने पकडले होते. गेल्या पंधरवड्यातही दिल्लीत रेल्वे स्थानकावर तस्करीचे ४३ किलो सोने पकडण्यात आले, त्यामध्येही सांगलीच्या काही तरुणांचा संबंध चर्चेत आहे.

केरळच्या अवघ्या राजकारणाला भंडावून सोडलेल्या सुवर्ण तस्करी प्रकरणाचे धागेदोरेही थेट सांगलीपर्यंत पोहोचले आहेत. तपास संस्थांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताने तस्करीचे तब्बल शंभर किलोहून अधिक सोने सांगलीला पाठवल्याची माहिती तपासाधिकाऱ्यांना दिली होती.

यामुळे सांगली जिल्हा सातत्याने सोने तस्करीच्या नकाशावर येत आहे. तस्करीच्या सोन्यातून दागिने घडविण्यासाठी सांगली हे एक महत्वाचे केंद्र बनत असल्याची टिप्पणी तपास संस्थांनी केली आहे. सोने वितळवून दागिने घडवले जात असल्याचे निरिक्षण आहे. त्यामुळे तपासाची सुई प्रामुख्याने काही गलई व्यावसायिकांकडे वारंवार वळत आहे.

तपास संस्थांचा सांगलीत मुक्काम

राष्ट्रीय तपास संस्थांचा मुक्काम शुक्रवारपासून सांगलीत आहे. स्थानिक पोलीसांच्या मदतीने त्यांचा तपास सुरु आहे. पण नेमक्या कोणत्या तस्करी प्रकरणात सांगलीकडे त्यांच्या घिरट्या आहेत हे स्पष्ट झाले नाही. हरियुरजवळ सापडलेले सोने आणि दिल्लीत रेल्वे स्थानकावर पकडलेली तस्करी या दोहोंपैकी नेमका कोणता तपास सुरु आहे हे स्पष्ट झाले नाही.

Web Title: Sangli becomes a center for making jewelery from smuggled gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.