सांगलीप्रमाणे कुपवाड, मिरजेत ‘फिश’ मार्केटला मंजुरी देणार; मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:18 IST2025-01-11T13:18:16+5:302025-01-11T13:18:43+5:30
सांगलीत अद्ययावत फिश मार्केटचे भूमिपूजन

सांगलीप्रमाणे कुपवाड, मिरजेत ‘फिश’ मार्केटला मंजुरी देणार; मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली ग्वाही
सांगली : सांगलीत उभ्या राहणाऱ्या फिश मार्केटमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोल्ड स्टोअरेज निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवा. तसेच कुपवाड आणि मिरजेला देखील फिश मार्केट होण्यासाठी प्रस्ताव सादर करा. त्याला तत्काळ मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी येथे दिली.
महापालिकेच्यावतीने खणभाग येथे अद्ययावत फिश मार्केटचे भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे, नीता केळकर, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राणे म्हणाले, सांगलीत अद्ययावत फिश मार्केट उभे राहण्यासाठी ॲड. स्वाती शिंदे यांचा पाठपुरावा सुरू होता. या फिश मार्केटवर आणखी एक मजला कोल्ड स्टोअरेजसाठी उभारण्याची मागणी येथे केली. त्यासाठी प्रस्ताव पाठवावा, त्याला परवानगी दिली जाईल. आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात आणखी दोन ठिकाणी फिश मार्केट उभारण्याची मागणी केली आहे. त्याचाही प्रस्ताव लवकर पाठवा. तो देखील मंजूर करण्याचा शब्द देतो.
ते पुढे म्हणाले, बऱ्याच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर येथे फिश मार्केट उभे राहत आहे. ते दर्जेदार आणि चांगले कसे होईल, याकडे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. दर्जाच्या बाबतीत कोणतीच तडजोड करू नका. आम्ही देखील निकृष्ट काम सहन करणार नाही. तसेच मार्केटमधील विक्रेत्यांनी बाहेर कोणी विक्री करणार नाही, याची दक्षता घ्यावी. मार्केटला शिस्त आणावी.
खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगलीतील फिश मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून भोई-मुस्लिम बांधव खेळीमेळीने व्यवसाय करत आहेत. या मार्केटसाठी केंद्राचा निधी मिळाला आहे. निधी कमी पडला तरी आणखी निधी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. खासदार निधीतूनही मदत केली जाईल. प्रकल्प चांगला होण्यासाठी प्रयत्न करू.
आयुक्त गुप्ता म्हणाले, या फिश मार्केटमध्ये आणखी एक मजला वाढवून मिळाल्यास तेथे कोल्ड स्टोअरेज करता येईल. त्यासाठी शब्द देऊन प्रस्ताव पाठवण्यास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे. महापालिका क्षेत्रात मिरज आणि कुपवाडमध्येही फिश मार्केटला मंजुरी मिळावी.
ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या, सांगलीत जुन्या मार्केटच्या जागी नवीन फिश मार्केट व्हावे, यासाठी गेली २० वर्षे पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला केंद्रातून मंजुरी मिळाली आहे. यावेळी भाजप नेते सम्राट महाडिक, माजी नगरसेविका सुनंदा राऊत, उर्मिला बेलवलकर, गीतांजली ढोपे-पाटील, निरंजन आवटी, मयूर पाटील, सद्दाम मकानदार आदींसह मत्स्य विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी आभार मानले.
अद्ययावत मार्केटमध्ये ८१ गाळे
अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ म्हणाले, येथे अद्ययावत फिश मार्केटमध्ये ३ बाय ३ मीटरचे ८१ गाळे उभारले जातील. स्वतंत्र डिस्पोजल युनिट असेल. प्रत्येकाला स्वतंत्र नळ कनेक्शन असेल. स्वच्छतागृह असेल.
कत्तलखाने बंद करा
मंत्री नितेश राणे महापालिका आयुक्त गुप्ता यांना उद्देशून म्हणाले, महापालिका क्षेत्रात दोन कत्तलखाने असल्याची माहिती मला मिळाली आहे. गोवंश हत्या कायदा राज्यात लागू आहे. त्यामुळे नागरिक आणि हिंदू म्हणून सांगतो, येथील कत्तलखाने बंद झाले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत ते सुरू राहता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करतो.