सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड 

By घनशाम नवाथे | Updated: February 1, 2026 22:37 IST2026-02-01T22:36:19+5:302026-02-01T22:37:26+5:30

जखमींमध्ये बंदोबस्तातील चार पोलिसांचा समावेश

Sangli Accident 11 seriously injured in hit and run incident in Sangli; drunk driver beaten up by mob, car vandalised | सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड 

सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड 

सांगली : येथील कृष्णाकाठावर कृष्णामाई महोत्सवाकडे जाण्यासाठी टिळक चौकाजवळ गर्दी उसळली असतानाच, नशेबाज मोटार चालकाने बेभानपणे पटेल चौक ते गणपती मंदिरापासून टिळक चौकाकडे येताना वाटेत गाड्यांना धडक देत थरार निर्माण केला. त्यानंतर, घाटाकडे जाणाऱ्या चौकात गर्दीमध्ये मोटार घुसवली. मोटारीच्या धडकेत चार पोलिसांसह ११ जण जखमी झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने चालक प्राणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा.कुलस्वामी रस्ता, बार्शी रस्ता, पाच नंबर स्टॉप, लातूर) याला चोप दिला, तसेच जमावाने मोटारीवर हल्लाबोल करत चक्काचूर केला.

जखमींमध्ये महिला पोलिस माया चव्हाण, सपना गराडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस लखन होवाळे, सुभद्रा निसरट यांच्यासह महेंद्र प्रताप पवार (वय १४, रा.जुना बुधगाव रस्ता, सांगली), पूर्वी सुनील फराटे (वय २३, रा.मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली सांगली), वदन सुनील फराटे (वय ३), अनुष्का विनायक फराटे (वय १७), अमया चव्हाण (वय ७), उमा विद्याधर नार्वेकर (वय ५०, रा.गावभाग सांगली), स्वप्निल शिवगोंडा पाटील (वय ३०, रा.पाटील गल्ली, नदीवेस मिरज) यांचा समावेश आहे.

मद्यधुंद चालक प्राणिकेत पांचाळ हा रविवारी सांगलीत मोटार (एमएच १४ एलबी ४९००) घेऊन आला होता. सांगलीतील टिळक चौकात सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्याने एका मोटारीला धडक दिली. त्यामुळे तेथील नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असल्याचे पाहून पांचाळ याने सुसाट वेगाने गणपती पेठेतून मंदिराकडे मोटार पळवली. मंदिराकडे वेगाने येताना त्याने वाटेत अनेक दुचाकींना धडक देण्यास सुरुवात केली. अनेकांनी हा थरार पाहून रस्त्याकडेला धूम ठोकली. 

चालक पांचाळ याने गणपती मंदिरासमोर डाव्या बाजूला पटेल चौकाकडे मोटार वळवतानाही काही गाड्यांना ठोकर दिली. त्यानंतर, पटेल चौकाकडे येताना कापडपेठ ते घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकात महोत्सवासाठी जाणाऱ्या लोकांची गर्दी झाली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह पोलिस ठाण्यांचे कर्मचारी बंदोबस्तात होते. गाड्यांना धडक देत आलेल्या चालक पांचाळ याने थेट गर्दीत मोटार घुसवली. 

दुरून हा थरार पाहणाऱ्या लोकांची एकच घाबरगुंडी उडाली. तोपर्यंत मोटारीने काहींना धडक दिली. धडकेनंतर त्याने टिळक चौकाकडे मोटार पळविण्याचा प्रयत्न केला. टिळक चौकातही मोठी गर्दी होती. वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार सुभद्रा निसरट आणि उपनिरीक्षक अविनाश घोरपडे हे बंदोबस्तासाठी होते. त्यांनी शिट्टी मारून मोटार चालकाला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने निसरट यांनाही धडक दिली. त्यानंतर, टिकळ चौकात एका दुचाकी चालकास धडक दिल्यानंतर मोटार थांबली, तोपर्यंत जमावाने त्याला गाठले. मोटारीतून बाहेर ओढत चोप दिला. त्यानंतर, मोटारीवर दगड फेकत तोडफोड सुरू केली. मोटारीच्या काचांचा चक्काचूर केला. तोपर्यंत पोलिसांनी चालक पांचाळ याला ताब्यात घेत सुटका केली. त्याच्यासह जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.

दरम्यान, अपघातानंतर टिळक चौक परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. हरभट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. जखमींच्या नातेवाइकांना माहिती मिळताच, त्यांनी सिव्हिल हाॅस्पिटलकडे धाव घेतली. रविवारची सुट्टी असतानाही सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नातेवाइकांची गर्दी झाली होती.

रात्री उशिरानंतर गुन्हा

हिट ॲन्ड रनमध्ये किती गाड्यांना धडक दिली, याचा सांगली शहर पोलिस तपास करत होते. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. काही जण गंभीर जखमी आहेत. रात्री उशिरा चालक पांचाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

समाज माध्यमावर थरार

बेधुंद चालकाने पोलिसांसह ११ जणांना धडक दिल्यानंतर त्याला चोप देत मोटारीचा चक्काचूर केला. मोटारीच्या तोडफोडीचा थरार अनेकांनी मोबाइलवर चित्रित करून तो व्हायरला केला.

काळ आला होता...

गणपती मंदिराजवळ बेदरकार चालकाचा थरार पाहून अनेकांचा थरकाप उडाला. मोटारीने धडक देताना अनेकांना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा अनुभव आला. काहींनी जीव वाचविण्यासाठी बाजूला उडी घेतल्यामुळे ते बचावले.

Web Title : सांगली: हिट एंड रन में 11 घायल; भीड़ ने चालक को पीटा, कार तोड़ी।

Web Summary : सांगली में एक नशे में धुत्त चालक ने हिट एंड रन में पुलिस सहित 11 लोगों को घायल कर दिया। गुस्साई भीड़ ने चालक पर हमला किया और उसकी कार को नष्ट कर दिया। घटना से यातायात बाधित हुआ, मामला दर्ज।

Web Title : Sangli: Hit-and-run injures 11; Mob thrashes driver, vandalizes car.

Web Summary : A drunk driver in Sangli injured 11, including police, during a hit-and-run. An enraged mob assaulted the driver and destroyed his car. The incident caused traffic chaos, and a case has been registered.