सांगली जिल्ह्यात १५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकीत, कामावर बहिष्कार घालण्याचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:27 IST2025-10-09T19:25:29+5:302025-10-09T19:27:32+5:30
अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते दोन महिन्यांपासून प्रलंबित

सांगली जिल्ह्यात १५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन थकीत, कामावर बहिष्कार घालण्याचा दिला इशारा
सांगली : जिल्हा परिषदेअंतर्गत तब्बल १५४ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते दोन महिन्यांपासून प्रलंबित आहेत. थकीत वेतन दिवाळीपूर्वी तत्काळ देण्यात यावे, अन्यथा प्रशासकीय कामावर बहिष्कार घालण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेच्यावतीने देण्यात आला.
मॅग्मो संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत सर्व गट-अ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते मागील दोन ते तीन महिन्यांपासून नियमितपणे प्राप्त होत नाहीत. निधीअभावी निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे वैद्यकीय अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व आर्थिक असुरक्षितता वाढली असून, ग्रामीण आरोग्य सेवा व्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.
दरमहा निधीअभावी वेतन उशिराने मिळत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्जफेड, शिक्षण व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या वाढीचे हप्ते अद्याप लागू झालेले नाहीत. सर्व प्रलंबित वेतन व भत्ते दिवाळीपूर्वी वितरित करण्यात यावेत. वेतन वितरण प्रक्रिया दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत नियमित करण्यासाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून द्यावा. अन्यथा प्रशासकीय कामांवर बहिष्कार घालू, असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. पाटील यांनी दिला.
यावेळी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. अभिजित सांगलीकर, डॉ. विनय कारंडे, डॉ. अभिषेक शिरोळे, डॉ. विजय सूर्यवंशी, डॉ. शुभम खोदांडे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. प्रमोद भोसले तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.