सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:05 IST2026-01-02T14:05:27+5:302026-01-02T14:05:45+5:30
संचालक मंडळाचा निर्णय

सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेत २१ पदांवर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य पगारवाढ दिली. बँकेच्या चौकशीत या निर्णयामुळे बँकेला ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळले आहे. या नुकसानीची वसुली तत्कालीन संचालकांकडून करण्यासाठी शासनाने कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
जिल्हा बँकेच्या संचालकाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच संबंधितांना बँकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येणार आहेत. वसुली पूर्ण झाल्यास, काही आजी व माजी संचालकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यावरील चौकशीतील जबाबदारी कमी होऊ शकते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध तांत्रिक पदांसाठी २१ कर्मचाऱ्यांची भरती मागील संचालक मंडळाच्या काळात करण्यात आली होती.
संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पगारवाढ देण्यात आली. नियमबाह्य पगारवाढीमुळे बँकेचे नुकसान झाल्याचे ३५ लाख ८८ हजार रुपयांचे शासकीय लेखा परीक्षणात नमूद करण्यात आले. लेखा परीक्षकांनी नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधित संचालकांकडून वसुली करण्याची शिफारस केली आहे.
कर्मचारी न्यायालयात
जिल्हा बँकेतील २१ तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय वादग्रस्त बनला आहे. याप्रकरणात यापूर्वीच बँकेच्या लेखा परीक्षणात टिपणी करण्यात आली आहे. काय कारवाई केली? याचा अहवाल शासन व नाबार्डने बँकेकडे मागितला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना आधीच नोटिसा दिल्या आहेत. या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.