कोल्हापूरसह पाच महापालिकांना ९० कोटींचा निधी, सांगलीला मात्र भोपळाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:05 IST2025-12-16T19:05:17+5:302025-12-16T19:05:45+5:30
नागरी सोयीसुविधांसाठी निधी, पहिल्या टप्प्यात २२ कोटींचे वितरण

कोल्हापूरसह पाच महापालिकांना ९० कोटींचा निधी, सांगलीला मात्र भोपळाच
सांगली : महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने पुणे विभागातील महापालिकांना २२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी वितरित केला; मात्र त्यामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या हाती भोपळाच मिळाला आहे.
मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९० कोटी रुपयांची तरतूद केली होती. लाभार्थी महापालिकांत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पिंपरी- चिंचवड, इचलकरंजी यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी तरतूद केलेल्या ९० कोटी रुपयांपैकी २२ कोटी ५० लाख रुपयांचा हप्ता शनिवारी (दि. १३) वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे. हा निधी अन्य कामांसाठी वळता करण्यात येऊ नये, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि इचलकरंजी महापालिकांना मिळून ९० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी २२ कोटी ५० लाख रुपयांचा हप्ता पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आला; पण यामध्ये सांगली, मिरज व कुपवाड महापालिका कोठेच नाही. वास्तविक महापालिकेला नागरी सोयीसुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. मात्र, या योजनेत लाभ मिळालेला नाही.
महाालिकांना मिळालेला निधी असा
वितरित करण्यात येणारी रक्कम अशी : महापालिका, मंजूर रक्कम आणि वितरित केलेली रक्कम : पिंपरी चिंचवड - ५ कोटी, १ कोटी २५ लाख. पुणे - ४५ कोटी, ११ कोटी २५ लाख. सोलापूर - ५ कोटी, १ कोटी २५ लाख. कोल्हापूर - ३० कोटी, ७ कोटी ५० लाख. इचलकरंजी - ५ कोटी, १ कोटी २५ लाख