Sangli: विट्यात देवाच्या पालखीची शर्यत, मूळस्थानच्या रेवणसिद्धची पालखी प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:01 IST2025-10-04T17:00:47+5:302025-10-04T17:01:56+5:30
लाखो भाविकांची गर्दी

Sangli: विट्यात देवाच्या पालखीची शर्यत, मूळस्थानच्या रेवणसिद्धची पालखी प्रथम
विटा : दीडशे वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या विटा (जि. सांगली) येथे विजयादशमी दिवशी होणाऱ्या ऐतिहासिक पालखी शर्यतीत मूळस्थानच्या रेवणसिद्ध देवाच्या पालखीने बाजी मारली. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांच्या साक्षीने हा दसरा पालखीचा सोहळा गुरुवारी पार पडला.
विटा येथे विजयादशमी दिवशी एकाच देवाच्या दोन पालखीची शर्यत होते. गुरुवारी दसऱ्यादिवशी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पालखी शर्यत सुरू झाली. त्यापूर्वी विटा येथील श्री भैरवनाथ मंदिराजवळ विटा येथील रेवणसिद्ध आणि श्रीक्षेत्र मुळस्थानच्या श्री रेवणसिद्ध नाथाच्या पालख्या आल्या. यावेळी विट्याचे ग्रामदैवत भैरवनाथ, सिद्धनाथ, म्हसवड सिद्धनाथ देवाच्या पालख्या या ठिकाणी दाखल झाल्या. काळेश्वर मंदिराजवळ एकत्रित सर्व पालख्यांतील श्रींची आरती करण्यात आली.
त्यानंतर विटा आणि मूळस्थान या दोन पालख्यांमध्ये शर्यत झाली. या दोन्ही पालख्यांमध्ये श्री रेवणनाथ देवांची मूर्ती होती. सुरुवातीला मूळस्थानच्या पाहुणी असलेल्या पालखीला प्रथेप्रमाणे पाच पावलं पुढे जाण्याचा मान दिला. त्यानंतर शर्यत सुरू झाली. दोन्ही बाजूचे समर्थक आपआपली पालखी पुढे नेण्यासाठी धावत होते. मात्र, मूळस्थानची पालखीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मूळस्थान आणि विट्याच्या पालखीत थोडे अंतर पडले.
सुरुवातीपासूनच मूळस्थानची पालखी पुढे होती. पाठीमागून तितक्याच जोमाने विट्याची पालखी धावत होती. मात्र, मूळस्थानची पालखी पुढे गेली. प्रत्यक्ष शिलंगण मैदानावर मूळस्थान सुळेवाडीच्या रेवणसिद्ध देवाच्या पालखीने बाजी मारली.
यावेळी ''नाथबाबाच्या नावानं चांगभलं'' असा जयघोष केला. गांधी चौकातील काळेश्वर मंदिर ते खानापूर नाक्यावरील शिलंगण मैदानापर्यंतच्या रस्त्यावर हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. शर्यत मार्गाच्या शेजारीच्या इमारतींवर उभारून आणि रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केलेल्या हजारो लोकांनी शर्यतीचा आनंद घेतला.
यावर्षी पालखी शर्यतीचे चांगले नियोजन करण्यात आले होते. हा सोहळा केवळ एक शर्यत नव्हे, तर भक्ती, परंपरेचा संगम ठरला. किरकोळ प्रकार वगळता शर्यती लवेळी कोणतीही हुल्लडबाजी, रेटारेटी झाली नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.