घाटमाथ्यावर किरकोळ द्राक्षविक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:38+5:302021-02-05T07:25:38+5:30

सध्या तालुक्यातील अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य बनल्या आहेत. नगदी पीक म्हणून बळीराजाने द्राक्षशेतीला पसंती दिल्याने तालुक्यात द्राक्षशेती क्षेत्रही मोठे आहे. ...

Retail sales increased at Ghatmathya | घाटमाथ्यावर किरकोळ द्राक्षविक्री वाढली

घाटमाथ्यावर किरकोळ द्राक्षविक्री वाढली

सध्या तालुक्यातील अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य बनल्या आहेत. नगदी पीक म्हणून बळीराजाने द्राक्षशेतीला पसंती दिल्याने तालुक्यात द्राक्षशेती क्षेत्रही मोठे आहे. यंदा द्राक्ष पीकही चांगले आहे. पण संकटांवर संकटे झेलत जगविलेल्या द्राक्ष बागांचा उत्पादन खर्चही मोठा झाला आहे. यामुळे बळीराजा चांगल्या दराची अपेक्षा ठेवून आहे.

परंतु माल तयार होऊनही द्राक्ष दलाला परिसरात दाखल न झाल्याने शेतकरीराजा व्यापाऱ्यांची प्रतीक्षा करत आहे. दरवर्षी यावेळी स्थानिक व परप्रांतीय व्यापाऱ्यांचे तांडेंच्या तांडे येत असतात.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर किरकोळ द्राक्ष विक्रेत्यांनी रस्त्याकडेला आपले छोटे-छोटे स्टॉल उभारले आहेत. दिवसभर भर उन्हात विक्री करून त्यावर त्यांची उपजीविका सुरू झाली आहे. नागज ते शिरढोणदरम्यान जवळजवळ चाळीस ते पन्नास किरकोळ द्राक्ष विक्रेत्यांनी आपले स्टॉल उभारले आहेत. सध्या द्राक्ष हंगामाबरोबरच उन्हाळाही सुरू झाला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी थेट बागेतच रोखीने व्यवहार करत द्राक्षे विकत आहेत, तर काही शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळण्याच्या विचारात दिसत आहेत.

चाैकट

कुची येथील स्थानिक सुमारे चाळीस ते पंचेचाळीस लोक किरकोळ द्राक्ष विक्रीचा व्यवसाय करत असतात. कमी भांडवलात त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. प्रति किलो चाळीस रुपये दराने द्राक्षे विकली जात आहेत.

दिवसाकाठी केवळ एक हजार रुपयेपर्यंत सरासरी विक्री होते. त्यातून खर्च वजा जाता त्यांना केवळ २५० ते ३०० रुपये नफा मिळतो आहे.

Web Title: Retail sales increased at Ghatmathya