सांगली जिल्हा परिषदेत 'महिलाराज', दिग्गजांना धक्का; कुणाचा पत्ता कट, कुणाला मिळणार संधी.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 16:02 IST2025-10-14T16:01:59+5:302025-10-14T16:02:21+5:30
मिनी मंत्रालयासाठी रंगणार आखाडा : ६१ गटांपैकी सात अनुसूचित जाती, १६ ओबीसी, ३८ सर्वसाधारण

सांगली जिल्हा परिषदेत 'महिलाराज', दिग्गजांना धक्का; कुणाचा पत्ता कट, कुणाला मिळणार संधी.. वाचा
सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये सात गट अनुसूचित जाती, १६ नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण ३८ गट आरक्षित झाले. ६१ पैकी ३१ गट महिलांसाठी आरक्षित झाले असून, यामध्ये अनेक दिग्गजांना धक्के बसले, तर दुसरीकडे काही इच्छुकांचा मिनी मंत्रालयात जाण्याचा रस्ता मोकळा झाल्याने उत्साह दिसून आला. या आरक्षणात बरेच बदल झाल्याने अनेक दिग्गजांना दुसरे मतदारसंघ (गट) शोधावे लागणार आहेत.
आरक्षण सोडत जिल्हा नियोजन सभागृहात काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसीलदार लीना खरात, आदी उपस्थित होते. आरक्षण सोडत नवीन पद्धतीने काढण्यात आली. यामुळे पूर्वी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद गट पुन्हा त्याच प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर होता.
प्रशासनाने पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती, नागरिकांचा इतर मागासप्रवर्ग, सर्वसाधारण जागांसाठीचे आरक्षण निश्चित केले. त्यानंतर महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची सोडत झाली. मिरज तालुक्यातील म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, बेडग, कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी आणि जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद गट सर्वाधिक लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी आरक्षित केले.
या आठ जिल्हा परिषद गटातून चार महिलांसाठी आरक्षण सोडत काढली. यामध्ये मिरज तालुक्यातील कवलापूर, म्हैसाळ, मालगाव आणि बेडग हे चार गट महिलांसाठी आरक्षित झाले. त्यानंतर १६ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढून आठ गट महिलांसाठी आरक्षित ठेवले. उर्वरित ३८ गट सर्वसाधारण राहिले होते त्यातील १९ जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित ठेवले.
...यांचा पत्ता कट
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचा म्हैसाळ गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला. माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती अरुण राजमाने, तमनगौडा रवी-पाटील, संग्रामसिंह देशमुख, प्रमोद शेंडगे, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद अर्जुन पाटील, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर, आदी दिग्ग्जांचा आरक्षण सोडतीमध्ये पत्ता कट झाला.
...यांना संधी
माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, सम्राट महाडिक (कामेरी), ब्रम्हानंद पडळकर (खरसुंडी), शरद लाड (कुंडल), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), सतीश पवार (मणेराजुरी), सरदार पाटील (मुचंडी), दिनकर पाटील (भोसे), सुनील पाटील, अर्जुन पाटील (विसापूर), आदींना संधी मिळणार आहे.
हरकतींना १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत
आरक्षण सोडतीबाबतच्या हरकती १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद गटाची हरकत जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समिती गणांची हरकत तालुक्यात तहसील कार्यालयात द्यायची आहे.
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण
अनुसूचित जाती : रांजणी (ता. कवठेमहांकाळ), उमदी (ता. जत), सावळज (ता. तासगाव). महिला : म्हैसाळ (एस), मालगाव, कवलापूर, बेडगाव (ता. मिरज).
नागरिकांचा मागास प्रवर्ग : मुचंडी, शेगाव (ता. जत), दिघंची (ता. आटपाडी), कुची, ढालगाव (ता. कवठेमहांकाळ), वाळवा, अंकलखोप (ता. पलूस), समडोळी (ता. मिरज). महिला : तडसर, कडेपूर, देवराष्ट्रे (ता. कडेगाव), बोरगाव, पेठ (ता. वाळवा), बिळूर (ता. जत), बुधगाव, कवठेपिरान (ता. मिरज).
सर्वसाधारण : दरिबडची, बनाळी (ता. जत), भोसे, कसबे डिग्रज (ता. मिरज), करगणी, खरसुंडी (ता. आटपाडी), विसापूर, मणेराजुरी, येळावी, चिंचणी, मांजर्डे (ता. तासगाव), कोकरुड, मांगले (ता. शिराळा), कुंडल, भिलवडी (ता. पलूस), बावची, भाळवणी, कामेरी, चिकुर्डे (ता. वाळवा). महिला : कासेगाव, वाटेगाव, बागणी, रेठरे हरणाक्ष, येलूर (ता. वाळवा), पणुंब्रेतर्फे वारुण, वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा), डफळापूर, संख, जाडरबोबलाद (ता. जत), एरंडोली, आरग (ता. मिरज), वांगी (ता. कडेगाव), नागनाथनगर नागेवाडी, करंजे, लेंगरे (ता. खानापूर), निंबवडे (ता. आटपाडी), देशिंग (ता. कवठेमहांकाळ), दुधोंडी (ता. पलूस).